पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण तिसरें : ७९

मंत्र्यांच्या गटबाजीसाठी प्रसिद्धच आहे. मुख्यमंत्री कैरों व ग्यानी कर्तारसिंग यांची भांडणे मिटविण्यासाठी ढेबरभाई नित्य पंजाबला जात असत. त्यांची पाठ वळली की भांडणें सुरू ? राजस्थानचे मुख्यमंत्री मोहनलाल सुखडिया व त्यांचे प्रतिस्पर्धी जयनारायण व्यास यांची यादवी १९५४ सालापासून चालू होती. सुखडियांना पदच्युत करण्याचे विरोधी गटाचे प्रयत्न सारखे चालू होते. आता त्यांच्यांत समझौता झाला आहे, तरी व्यास गटांतील अनेक लोक संतुष्ट नाहीतच. इतर राज्यांतहि हे युद्ध- आघाडीवरचे सेनापति याच उद्योगांत गुंतलेले असतात; आणि दुर्दैव असे की, स्वातंत्र्य मिळालेल्या क्षणापासून हे प्रकार चालू आहेत. मद्रासचे टी. प्रकाशम् व त्यांचे प्रतिस्पर्धी, बिहारमध्ये श्रीकृष्ण सिंह व अनुग्रह नारायणसिंह, पंजाबमध्ये भार्गव आणि साचार, मध्यभारतांत लीलाधर जोशी व विजयवर्गीय यांची भांडणें, मारामाऱ्या यांचा पं. नेहरू, वल्लभभाई, राजेन्द्रबाबू यांनी अनेक वेळां निषेध केला आहे. हीं सर्व भांडणें लोभ, स्वार्थ, गटबाजी यांतून उद्भवलेलीं आहेत. त्यांत तत्त्वाचा कसलाच प्रश्न नाहा, अशी टीका या श्रेष्ठींनीच केली आहे. देशाचे सेनापति कायम या कामांत असल्यामुळे युद्धआघाडी नेहमीच रिकामी राहिली तर नवल कसलें ?
 दण्डसत्तांनी दिलेले आव्हान स्वीकारण्याचें सामर्थ्य प्राप्त करून घ्यावयाचें असेल तर षडंगबल प्राप्त करून घेतले पाहिजे असें मागे अनेक वेळां सांगितलें आहे. ते भारताने प्राप्त करून घेतलें आहे काय, त्या प्रयत्नांत त्याला कितपत यश येत आहे याचा विचार आपण करीत आहों. संघटित दृढ ऐक्य जोपासणारा, यादवी, दुही, गटबाजी यांचे निर्मूलन करणारा समाज हे षडंगबलापैकी प्रमुख बल होय. वरील विवेचनावरून आपला समाज कितपत संघटित आहे याची कल्पना येईल. बहुतेक सर्व राज्यांत काँग्रेस ही संघटना चिरफळलेली आहे आणि युद्धाच्या काळीं तरी मतभेद, क्षुद्र स्वार्थ विसरावे हा विवेक वरच्या पातळीतल्या काँग्रेसजनांनासुद्धा नाही. सत्तालोभ त्यांना सुटत नाही. एकमेकांविरुद्ध कारस्थानें करण्यांत सध्याच्या बिकट युद्धकाळांतसुद्धा ते गुंतलेले आहेत. अशा स्थितीत समाज संघटित व्हावा कसा ?