पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण तिसरें : ७७

तयार नाही! हें अपयश फारच लाजिरवाणें आहे. याचें कारण एकच. महागाई आणि बेकारी नष्ट करण्याचे काँग्रेसचे प्रयत्न विपरीत गतीला जात आहेत. महागाई व बेकारी या अवकळा वाढतच आहेत. परवा मद्रासच्या काँग्रेसजनांनी मुख्य मंत्र्यांना निक्षून सांगितलें की, महागाई अशीच वाढत गेली, तर आपल्याला येथे स्थान नाही. या महागाईची कथा जास्त घातक आहे. मद्रास, कोकण (कुलाबा) व उत्तर प्रदेश येथे १९५९ साली पिके भरगच्च आली होती. पण वर्तमानपत्रांत शेजारी शेजारीच बातम्या येत होत्या- 'सोळा आणे पीक' आणि 'धान्याची वाढती महागाई' याचा अर्थ लोकांना आता समजू लागला आहे. पिके उत्तम आली तरी या राज्यांत खायला मिळेल की नाही, अशी अत्यंत दारुण शंका जनतेच्या मनांत घर करीत आहे !
 आपल्या योजना उत्तम असतांना, सर्वांगीण विचार करून त्या आखलेल्या असताना, साधनसामग्री व भांडवल यांची चांगली तरतूद केलेली असतांना त्या इतक्या विफल का व्हाव्या, त्यांना विपरीतच फळें का यावी, महागाई, बेकारी वाढतच का जावी या प्रश्नांनी कोणाहि भारतीयाचें मन व्याकुल झाल्यावाचून राहणार नाही. पण याचे कारण अगदी स्पष्ट आहे. तें हुडकण्यासाठी मोठे चिंतन करावयास पाहिजे असे नाही. परिश्रम, संशोधन कशाचीहि गरज नाहीं. अगदी एका साध्या वाक्यांत उत्तर द्यावयाचें तर तें असे की, या योजनांमागे 'भारतीय' उभा नाही.

सेनापति कोठे आहेत ?

 विषमता, अज्ञान, दारिद्र्य, बेकारी आपल्या देशांतून नष्ट करण्याचे येथे जे प्रयत्न चालू आहेत त्यांचे 'ही युद्धआघाडी आहे', 'दारिद्र्य, उपासमार या शत्रूशी ही लढाई आहे', 'विषमता, शोषण यांशीं हा संग्राम आहे', असें नेहमी वर्णन केलें जातें. त्यावरून एक प्रश्न मनांत येतो की, या लढाईत, या संग्रामांत या देशाचे जे नांवाजलेले लढवय्ये, सरदार, शिलेदार, बिनीचे वीर ते कोठे आहेत ? ते सर्व आघाडीवर असावयास पाहिजेत. युद्ध, संग्राम या एकाच विषयावर त्यांचें सारें लक्ष, सर्व शक्ति केंद्रित झाल्या असल्या पाहिजेत. क्षुद्र मतभेद, क्षुद्र स्वार्थ विसरून, सर्व