पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण तिसरें : ७३

केन्द्र अन्नमंत्री अजितप्रसाद जैन म्हणाले, "गेल्या अठरा महिन्यांत अन्नधान्याची परिस्थिति १९४३ सालच्या बंगालच्या दुष्काळाप्रमाणेच भीषण झाली आहे." पं. नेहरू म्हणाले, "देशांतल्या बहुसंख्य जनतेला प्राणधारणाच्या वस्तुहि मिळत नाहीत. कित्येक ठिकाणी तर प्यायचे पाणीसुद्धा नाही." अशी सर्वत्र महागाई आहे. बेकारीचा भस्मासुर असाच प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवीत चालला आहे. दहा वर्षांत सर्व बेकारी नष्ट करूं अशी आपण प्रतिज्ञा केली होती. दुसऱ्या योजनेंत ८० लाख लोकांना रोजगार मिळवून द्यावयाचा होता, पण आता ६० लाख लोकांनासुद्धा देतां येईल अशी खात्री नाही; आणि इतर रोजगार निर्माण झाला तरी १९६१ साली ७० लक्ष लोक बेकार राहणार असें केन्द्रीय रोजगार समितीचे अध्यक्ष गुलझारीलाल नंदाच सांगत आहेत. शिवाय तिसऱ्या योजनेच्या काळांत लोकसंख्येची भर पडून आणखी १ कोटि ४० लक्ष बेकार लोक निर्माण होतील ! हें झालें संपूर्ण बेकारीचे. पण ज्यांना रोजगार आहे त्यांची स्थिति पाहिली तर हें चित्र अधिकच भेसूर दिसतें. भारत सरकारचे आर्थिक सल्लागार प्रा. महलोनबीस यांनी सांगितलें आहे की, दोन कोटि लोकांना रोज एकच तास काम मिळतें. आणखी ४॥ कोटि लोकांना ४ तासांपेक्षा कमी काम मिळते. याशिवाय पुष्कळांना ८-१० तास काम करूनहि अर्धपोटी राहावें लागतें, हें सर्वांनाच माहीत आहे. आपण स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या १२ वर्षांच्या काळांत जीवनधनाच्या बाबतीत अशी प्रगति केली आहे ! आपले मार्ग लोकशाहीचे आहेत, निदान आपण तसें म्हणतों. चीनला आपल्यापेक्षा दोन वर्षे उशीरा स्वातंत्र्य मिळाले. तेथली लोकसंख्या ६५ कोटि आहे. पण १० वर्षांच्या अवधींत नवचीनने अन्नधान्याचा प्रश्न सोडवीत आणला आहे. यूनोचे एके काळचे अन्नप्रश्नाचे तज्ज्ञ लॉर्ड बॉईड ऑर हे नुकताच चीनचा दीर्घ प्रवास करून आले. ते म्हणाले की, चीनने गेल्या तीन वर्षांत आपलें अन्नधान्य दुपटीने वाढविलें आहे. दर एकरी चीन इंग्लंडइतकें धान्य पिकवू शकतो. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येलाहि चीन अन्न पुरवूं शकेल असें ऑर म्हणतात. त्याचप्रमाणे चीनने औद्योगिक उत्पादनहि प्रचंड प्रमाणांत वाढविले आहे. पांखरें, उंदीर, घुशीं हे प्राणी दरसाल कोटि कोटि टन धान्याचा फडशा पाडतात. चीनने त्यांचा संपूर्ण नायनाट केला आहे. पण