पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६८ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

 आमच्या लोकशाही मार्गाची दोन लक्षणे सांगितली. राहणीचें मान वाढतें ठेवून औद्योगीकरण करणें आणि वर्गभेद, विषमता नष्ट करण्यासाठी हृदयपरिवर्तनाचा अवलंब करणें हीं ती लक्षणें होत. शुद्ध, अभ्रष्ट आणि अत्यंत दक्ष व कार्यक्षम राज्यकारभार हें तिसरें लक्षण होय. कारभार असा असल्यावाचून जनतेचा विश्वास व सहकार्य संपादणें अशक्य आहे. सार्वजनिक पैसा हा देशाच्या कारणींच खर्ची पडत आहे असे दिसलें तरच राष्ट्रकार्याची जबाबदारी शिरावर घेण्यास जनता तयार होते. म्हणून या विषयी आम्ही अत्यंत दक्षतेने जागता पहारा ठेवला आहे. त्यासाठी एक स्वतंत्र समिति नेमलेली आहे. शुद्धता ही बरीचशी कार्यक्षमतेवर अवलंबून असते. ही कार्यक्षमता साधावी म्हणून सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचें धोरण आम्हीं अंगीकारिलें आहे. सरकारी दीर्घसूत्री कारभार, नोकरशाही चेंगटपणा, लाल फितीची पद्धत हे सर्व कार्यक्षमतेच्या आड येत असतें. तें नाहीसे करून कार्याचा वेग सतत वाढता ठेवण्याकडे आमची दृष्टि राहील (पृ. ११५).
 या सर्व कार्यामध्ये बहुजनांचे सहकार्य हे आमचे खरें बळ आहे. भारताचा विकास हे कार्य बहुजनांचे आहे व त्यांनीच तें करावयाचे आहे. सरकार पैसा पुरवील, मार्गदर्शन करील, सरकारी अधिकारी जनतेच्या साह्याला नित्य उभे राहतील; पण बहुजनांत उठाव निर्माण करणें, त्यांना कार्यप्रवण करणें हेंच त्यांचे मुख्य काम राहील. लोकांनी स्वतः आपला आपण उद्धार करणें हें लोकशाहीचे सर्वांत मोठे लक्षण होय. या मार्गानेच येथील लोकांचें व्यक्तित्व विकसित होईल. त्यांचा आत्मा विशाल होईल. ते खरेखुरे नागरिक होतील. अन्नधान्य, पोलाद, वीज, पेट्रोल, अणुशक्ति हे जड ऐश्वर्य आम्हांला प्राप्त करून घ्यावयाचें आहेच, पण आमचें खरें उद्दिष्ट म्हणजे आत्म्याचें ऐश्वर्य हे होय, म्हणजेच व्यक्तीचें व्यक्तित्व होय. यासाठी प्रत्येक राज्यांतील प्रत्येक खेड्यांतील जनता जागृत व्हावी व आपल्या खेड्याचा उद्धार, विकास करण्यास तिने कटिबद्ध व्हावें म्हणून आम्ही विश्वप्रयत्न करूं. आमचे व आमच्या लोकशाहीचें खरें यश त्यांत आहे.