पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण तिसरें : ६७

त्यांनी जाणून बुजून जीवनधनाकडे दुर्लक्ष केलें व दण्डसत्तेच्या जोरावर लोकांच्या राहणीचें मान अगदी खाली नेलें. आम्ही तसें करणार नाहीं. मानवी मूल्यांचा बळी देऊन, लोकशाही तत्वांना मुरड घालून आम्हांला प्रगति करावयाची नाही. तो लोकशाहीचा, अहिंसेचा, प्रेमाचा, न्यायाचा मार्ग नव्हे. ती हुकुमशाही झाली. दण्डसत्ता झाली. म्हणून जीवनावश्यक धनांची हेळसांड न करतां त्यांची तूट न येऊ देतां, सुबत्ता निर्माण करून, राहणीचें मान वाढतें ठेवीत आम्ही औद्योगीकरण साधणार आहों. हीच तर आमच्या लोकशाही ध्येयवादाची कसोटी आहे. सुबत्ता निर्मून, अवश्य तें कृषिधन पैदा करून त्याच वेळीं औद्योगीकरणाला अवश्य तें भांडवल पुरवितां आलें तरच आम्ही या कसोटीला उतरलों असें ठरेल. जनतेच्या सहकार्याने, लोकशक्तीच्या साह्याने, अविरत कष्टाने त्यागाने भारताला या कसोटीला उतरतां येईल अशी आमची खात्री आहे (न्यू इंडिया : पृ. २२, २४, ४३, ४९.)
 आमच्या या देशांत अनेक प्रकारचे मिरासदार आहेत, भांडवलदार आहेत, जमीनदार आहेत, अनेक प्रकारचे धनपति आहेत. दरिद्री बहुजन समाज व हे मिराशी यांचे हितसंबंध परस्परविरोधी आहेत, हें आम्ही जाणतो. पण इतर देशांतल्याप्रमाणे हिंसेने या मिरासदारांना नष्ट करावयाचें हे आमचें धोरण नाही. हृदयपरिवर्तन हेंच आमचें धोरण, हाच आमचा मार्ग होय. गांधीजी त्यांना विश्वस्त मानीत. आम्ही ही भूमिका त्यांनी मान्य करावी म्हणून, त्यांचें परिवर्तन करूं. वर्गविग्रह चेतवून हें कार्य साधावें असें आमच्या स्वप्नांतसुद्धा येणार नाही. आमचा मार्ग सहकार्याचा, प्रेमाचा, हृदयपरिवर्तनाचा, अहिंसेचा आहे. समाजवादी समाजरचना आम्हांला करावयाची आहे. याचा अर्थ असा की, या समाजांत वर्गभेद राहणार नाहीत. सर्वांना समान संधि मिळेल आणि प्रत्येकाला जीवन समृद्ध करण्यास अवसर मिळेल. राहणीचें मान वाढविणें, भिन्न वर्गांत सहकार्य निर्माण करणे, मागासलेल्या वर्गांना नवी चेतना देणें हें आमचें उद्दिष्ट आहे. समाजवादी समाजरचना ती हीच. ही सर्व क्रान्ति आम्ही मतपरिवर्तनाने करणार. या मार्गाने ती साधेल अशी आमची खात्री आहे. भारतीय जनतेवर, बहुजनांवर आमचा विश्वास आहे (पृ. ३३, ३५, ३६).