पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६६ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

भारताच्या प्रतिज्ञा
 होय. आपल्या नेत्यांना याविषयी कसलाहि संदेह नाही. लोकशाही मूल्यांना यत्किंचितहि मुरड न घालता, पूर्ण लोकशाही मार्गानी, साधन- शुद्धीचे ब्रीद संभाळून आम्ही अवश्य तें सामर्थ्य निर्माण करून हैं आव्हान निश्चितपणें स्वीकारू, अशी काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्राला ग्वाही दिलेली आहे. हें आपल्याला साधेल असा पूर्ण आत्मविश्वास त्यांना आहे. आपल्या नियोजन समितीने १९५८ साली 'न्यू इंडिया' या नांवाचा ग्रंथ प्रसिद्ध केला आहे. त्यांत अनेक ठिकाणी अशा तऱ्हेच्या घोषणा दिलेल्या आहेत. "साध्याइतकेंच साधनांना महत्त्व आम्ही देतों, साधनशुचिता हें आमचें ब्रीद आहे. अहिंसाप्रधान लोकशाही मार्गाने आम्ही देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून दिले आहे. राजकीय स्वातंत्र्याप्रमाणेच आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्यहि आम्ही त्याच मार्गांनी मिळवूं अशी आमची प्रतिज्ञा आहे" असा उद्घोष ग्रंथाच्या प्रस्तावनेंतच आहे. त्यांत असेंहि म्हटलें आहे की, "कांहीं आक्षेपक म्हणतात की, लोकायत्त मार्गांनी या समस्या सुटणार नाहीत, किंवा निदान अवश्य त्या द्रुतगतीने त्या सोडवितां येणार नाहीत. पण आमचा असा आत्मविश्वास आहे की, आम्ही हें दोन्ही साधू शकूं. समस्या तर सोडवूंच आणि त्या द्रुतगतीनेहि सोडवू, आणि अशा रीतीने पूर्ण लोकायत मार्गाने आम्ही हें आव्हान स्वीकारूं." ग्रंथाला 'प्रोग्रेस थ्रू डेमॉक्रसी' असें उपनाम याच हेतूने दिलेलें आहे.
 प्रस्तावनेत या प्रकारच्या प्रतिज्ञांचा उच्चार केलेला आहे, आणि पुढे ग्रंथांत लोकशाही मार्ग म्हणजे काय, साधनशुचिता म्हणजे काय, लोकशाही मूल्यांचे संरक्षण म्हणजे काय, हें ठिकठिकाणी स्पष्ट केलें आहे. त्याचा भावार्थ असा आहे- औद्योगीकरण करणें हें आमचें निश्चित उद्दिष्ट आहे. त्यावाचून, महायंत्रोत्पादनावाचून भारताची प्रगति होणार नाही. पण पोलाद, कोळसा, पेट्रोल, वीज, यंत्रे यांचें उत्पादन वाढवितांना अन्नवस्त्रघर हे जीवनधन वाढविण्याकडे आम्ही तितकेंच लक्ष पुरवू. औद्योगीकरणासाठी आम्ही भांडवल घालीत राहणारच, पण त्यासाठी लोकांच्या राहणीचें मान कधीच कमी होऊ देणार नाहीं. तसें करणें हें दण्डसत्तेचें लक्षण होय. गेल्या पंचवीस वर्षांत इतर अनेक देशांनी औद्योगीकरणाचे प्रयत्न केले, पण