पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण तिसरें : ६५

वसाहतींतून त्यांनी अमाप भांडवल जमविलें. रशिया, चीन यांना हा मार्ग मोकळा नव्हता; तेव्हा त्यांनी स्वतःच्या जनतेचा रक्तशोष करून भांडवल जमविलें. आपल्याला हे दोन्ही मार्ग वर्ज्य आहेत, मग आपण भांडवल आणणार कोठून ? औद्योगीकरणासाठी अत्यंत प्रतिभासंपन्न अशा शास्त्रज्ञांची थोर परंपरा देशांत असावी लागते, आणि देशांत शास्त्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी शिक्षणाची, विद्यापीठांची उत्तम व्यवस्था अवश्य असते. हें ज्ञान आपल्याजवळ आहे काय ? नसल्यास तें कसें प्राप्त करून घ्यावयाचें ? याची तरतूद आपल्याला करता येईल काय ? अणुअस्त्रे, तोफा, रणगाडे, बाँबर विमानें, विविध प्रकारचे अग्निगोल हीं शस्त्रास्त्रे म्हणजे दशशतकोटींचा मामला असतो. आपल्यासारख्या दरिद्री देशाला याचा विचार तरी करतां येईल काय ? आणि न आला तर पुढला विचार काय ? या सगळ्या जडसामर्थ्याच्या मागे संघटित असें राष्ट्र उभे असावें लागतें. आपण संघटित आहों काय ? जातीय भेद, प्रांतीय भेद, धर्मभेद, स्पृश्य-अस्पृश्य भेद, दक्षिणोत्तर वाद, भाषिक भेद, आर्थिक विषमता, वर्गविग्रह यांनी आपला भारत देश जर्जर झालेला दिसतो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हे भेद जास्तच चिघळले आहेत. आपली राष्ट्रनिष्ठा, अखिल भारतीय ऐक्यावरील आपली श्रद्धा विचलित झालेली दिसते. तिला ठायीं ठायीं तडे गेलेले आहेत. भांडवल परक्या देशांतून आणतां येतें, पण ही निष्ठा आपण कोठून आणणार आहोत? संघटित राष्ट्रांच्या मागे शीलचारित्र्यसंपन्न कर्ते पुरुष, मुत्सद्दी, तत्त्ववेत्ते, इतिहासकार, वक्ते, ग्रंथकार, कवि, रणपंडित, धर्मप्रवक्ते यांची थोर परंपरा असली तरच या सामग्रींतून नवसृष्टि निर्माण होऊं शकते. ती परंपरा भारतांत आहे काय ? नसल्यास ती कशी निर्माण करावयाची ? दण्डसत्तांचे आव्हान स्वीकारायचें म्हणजे इतक्या समस्या सोडविण्याची ऐपत आपल्या ठायीं असणें अवश्य आहे. ती आपल्या ठायीं आहे काय ? आपल्या सरकारचें याविषयीं काय मत आहे? सरकारच्या मागे उभी असलेली जी काँग्रेसची संघटना तिने या समस्या जाणल्या आहेत काय ?' आणि जाणल्या असल्या तर ते आव्हान स्वीकारण्याची कांही सिद्धता ती करीत आहे काय ? वर सांगितलेल्या सर्व भावार्थाने दण्डसत्तांचें हे आव्हान आपल्याला स्वीकारतां येईल असें आपल्या नेत्यांना वाटतें काय ?

 लो. ५