पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण दुसरें : ६३

 ही जागरूक जनता हेंच अमेरिकेचें खरें बळ आहे. आज अमेरिकेतील ग्रंथकार, तत्त्ववेत्ते, समाजशास्त्रज्ञ, शिक्षक, धर्मगुरु आपल्या देशांतील अनीति, गुन्हेगारी, भ्रष्टता, अधर्म यांची फार गंभीरपणें चर्चा करीत आहेत, हें त्याचेंच लक्षण आहे. शेकडो, हजारो, ध्येयवादी लोक निरनिराळया योजना आखून त्या कार्यवाहीत आणून तेथील अनीतीला पायबंद घालण्यासाठी जीवाचें रान करीत आहेत. याचेच नांव विवेकशक्ति. या विवेकशक्तीच्या उपासनेमुळेच अमेरिकेने गेली शंभर वर्षे भांडवलशाहीशीं झगडून तिच्यावर मात केली आहे. हा विजय फार मोठा आहे. राष्ट्रहितासाठी धनलोभाचा त्याग करावा ही सद्बुद्धि अमेरिकन भांडवलदारांत जागृत आहे असा याचा अर्थ होतो. मागे सांगितल्याप्रमाणे निग्रोंचा प्रश्नहि बराचसा अमेरिकन जनतेने सोडवीत आणला हें तर त्यांच्या मनःसंयमाचें, विवेकाचें फार मोठे लक्षण आहे. या सर्वांचे कारण माझ्या मतें एक आहे. अमेरिकेची व्यक्तिस्वातंत्र्यावरची भक्ति ! परमेश्वराचा एकनिष्ठ भक्त ज्याप्रमाणे, 'देह जावो अथवा राहो' या भावनेने, देवासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यास सिद्ध होतो त्याचप्रमाणे अमेरिकन लोक व्यक्तिस्वातंत्र्याच्या रक्षणासाठी वाटेल तो होम करण्यास सिद्ध होतील. 'व्यक्तिस्वातंत्र्य किंवा मृत्यु' असाच त्यांचा बाणा आहे; व्यक्तिस्वातंत्र्याची ही भक्ति अमेरिकेतील सामान्यांतल्या सामान्य मनुष्याच्या रक्तांत भिनलेली आहे. त्यामुळे क्षणकाळ जरी तेथील समाजाच्या मनाला मालिन्य आलें असले तरी लवकरच त्या मनांतील विवेकज्योत पुन्हा पाजळेल, काजळी निघून जाईल आणि लोकशाही व अमेरिकन संस्कृति यांच्या रक्षणासाठी अमेरिकन नागरिक प्राणांचे मोल देण्यास सिद्ध होऊन संग्रामांत उभा ठाकेल याविषयी कोणालाहि संदेह नाही. म्हणून, 'कम्युनिस्ट दण्डसत्तांनी दिलेलें आव्हान, आपली लोकशाही मूल्ये पूर्णपणें अबाधित ठेवून, त्यांना तिळमात्रहि धक्का न लावतां, त्यांना अणुमात्रहि मुरड न घालतां, आम्ही सहज स्वीकारू शकूं' असे अमेरिकेतील कर्त्या पुरुषांनी, नेत्यांनी व रणपंडितांनी जगाला जें आश्वासन दिले आहे ते अगदी यथार्थ आहे, सारगर्भ आहे असें मानण्यास कसलाच प्रत्यवाय नाही.

+ + +