पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६२ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

स्थापन झाली आहे. १० ते २० या वयाच्या मुलांना या लीगचे सभासद होतां येतें. लोगन काउंटीचे शेरीफ ग्रोव्हर कोंब यांचे या बाबतींतले अनुभव सांगतों. ८०००० वस्तीचा हा जिल्हा असून तेथील शेकडा ८५ कुटुंबे कोळशाच्या खाणींत काम करतात. त्यांच्या मुलांमध्ये गुन्हेगारीचें प्रमाण फार मोठें होतें. चोरी, सुरामारी हे नित्याचे प्रकार असत. शेरीफ कोंब यांनी या मुलांच्यांत प्रचार करून त्यांना वरील लीगचे सभासद करून घेतले आणि अनेक कामे जबाबदारीने त्यांच्यावर सोपविली. गांवांतील चोऱ्यामाऱ्या हुडकून काढणे, गावांतील स्वच्छतेकडे लक्ष ठेवणें, खेळांचीं मैदानें तयार करणें, आपापल्या शाळेत बागा तयार करणें, दुरुस्त्या करणें आणि इतरहि अनेक प्रकारची जनसेवा करणे हीं कामें तीं मुलें हौसेने करूं लागलीं आणि गुन्हेगारीचे प्रमाण झपाट्याने कमी झालें. तें इतके की, रिमांड होमचे व्यवस्थापक जेसी रिले यांनी लोगन काउंटीत निराळा प्रकार काय घडला आहे याची मुद्दाम चौकशी केली. कारण तेथून बाल गुन्हेगार मुळीच येईनासे झाले. या लीगचा प्रसार आता सर्व ४८ राज्यांत झाला असून सुमारें १० लाख मुलें 'ज्युनिअर डेप्युटी शेरीफ' झालेली आहेत. तरुण मुलांच्या अंगच्या उसळत्या रक्ताला कांहीतरी लोककल्याणाच्या, समाजसेवेच्या कार्याला लावणें, त्यांच्यावर जबाबदारी टाकणें हें यांतलें मुख्य सूत्र आहे. यांतून त्यांच्यावर फार उत्तम संस्कार होतात आणि वाममार्गानी जाणारी शक्ति सन्मार्गाला लागते. डॉ. ग्लेन यांनी अलबामा राज्यांतील बर्मिंगहॅम या गावी शाळा काढून ती याच धोरणाने चालविली आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाखेरीज समाजसेवेचीं कामें करावयास लावणें, त्यांच्यावर जबाबदारी टाकणें, आपणांस मोठेपणा मिळावा, मान मिळावा ही त्यांची भूक या रीतीने तृप्त करणें आणि अशा रीतीने त्यांची अस्मिता संतुष्ट करून त्यांचे कर्तृत्व उदयास आणणें हें यांतील मुख्य तत्व आहे. तात्पर्यार्थ असा की, चीन- रशियामध्ये जें दण्डसतेने साधतात तेंच अमेरिकेत लोकशाही मार्गांनी शिक्षणाने, संस्काराने साधावें असा हा प्रयत्न आहे. त्याला यशहि भरघोस येत आहे असें दिसतें. यावरून अमेरिकेतील जनता अंतरांत चांगलीच जागरूक झाली आहे हें प्रत्ययास येतें. कारण या दोन्ही प्रकारच्या उपक्रमांना नागरिकांनी तनमनधन खर्चून साहय केलें आहे.