पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण दुसरें : ६१

त्यांना आहे. म्हणूनच नीति-अनीतीच्या लढ्यांत नीति पुनः पुन्हा विजयी होऊं शकते. या अनीतीवर, राज्यकारभारांतील भ्रष्टतेवर अखंड पाहरा ठेवण्यासाठी अमेरिकन लोकसभेने काँग्रेसने एक कायमची समितिच नेमलेली आहे. या सर्वाधिकार समितीची स्थापना १७९१ सालीच झालेली आहे; आणि गेल्या दीडशे वर्षांत तिने अशीं एक हजार प्रकरणें धसास लावली आहेत. विशेष म्हणजे ही समिति कोणाचाहि मुलाहिजा ठेवीत नाही. १९३३ साली तिने स्टॉक मार्केटचें शोधन केलें. त्या वेळी मॉर्गन व्हिटने, आटोखान मिचेल अशा मोठमोठ्या भांडवलाधीशांना साक्षीदाराच्या पिंजऱ्यांत उभे करून समितीने त्यांची सर्व कारस्थानें जनतेपुढे उघडी करून मांडली. त्यामुळे स्टॉक मार्केटच्या कायद्यांत फार मोठ्या सुधारणा करतां आल्या. ही समिति मंत्र्यांनाहि तुरुंगांत टाकण्याइतकी निःस्पृह आहे. अल्बर्ट फॉल हा अध्यक्ष हार्डिंग याचा गृहमंत्री. त्याने आपला एक मित्र एडवर्ड डोहने याला सरकारी तेलाच्या खाणीचा मक्ता, कायद्याप्रमाणे टेंडरें मागवावयाचीं तीं न भागवितां आपल्या अधिकारांत तसाच देऊन टाकला. उलट डोहने याने फॉल याला ५ लाख रु. कर्ज (?) म्हणून दिले. हे प्रकरण उजेडांत आलें तेव्हा एवढा गदारोळ झाला, जनतेच्या संतापाचा एवढा वडवानल पेटला की, त्यांत अल्बर्ट फॉलची तर आहुति पडलीच पण अध्यक्ष हार्डिंग, त्याचें मंत्रिमंडळ आणि त्याचा रिपब्लिकन पक्ष यांचाहि ध्रुव्वा उडाला.
 दुसऱ्या महायुद्धाच्या काळांत काँग्रेसच्या ट्रुमन् कमिटीने संरक्षणखात्यांतील भ्रष्टता, अपहार, लूट, लाच इत्यादि गुन्हेगारी उघडकीस आणून जनतेचे ७५०० कोटि रुपये वांचविले, आणि त्यांतील कुविख्यात डाकूंना तुरुंगांत धाडलें. कामगार संघटनांत अशीच ठग पेंढारशाही चालते. सीनेटर मॅक क्लेलन यांच्या अध्यक्षतेखाली सध्या तिचें शोधन चालू आहे.
 गुन्हेगार, चोर, डाकू यांच्या दण्डनाविषयी हें झालें. पण समाजांतल्या या दुष्प्रवृत्ति मुळांतच नष्ट व्हाव्या म्हणून बाल-तरुण विद्यार्थ्यांच्या शिक्षणांत व बालपणच्या संस्कारांत आमूलाग्र क्रान्ति घडवून आणणारे ध्येयवादी शिक्षक व कार्यकर्ते हेहि अमेरिकेत सारखे निर्माण होत असतात. अमेरिकेत 'ज्यूनियर डेप्युटी शेरीफ लीग' या नांवाची संस्था १९४७ च्या सुमारास