पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६० : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

 अमेरिकेने कम्युनिस्ट दण्डसत्तांचे आव्हान कसें स्वीकारलें, तें स्वीकारण्याचें व त्याला प्रत्युत्तर देण्याचें सामर्थ्य त्या जगाच्या अग्रभागी असलेल्या लोकसत्तेच्या ठायीं कितपत आहे याचा येथवर आपण विचार केला. केवळ आजचा विचार केला तर हे आव्हान अमेरिका अगदी लीलया स्वीकारू शकेल हें आपल्याला प्रारंभींच्या विवेचनावरून दिसून येईल. दण्डसत्तांची कितीहि प्रगति झालेली असली, तरी अमेरिकेच्या आजच्या सामर्थ्याच्या तुलनेने त्यांचें सामर्थ्य फार तोकडें आहे. अमेरिकेच्या आजच्या सामर्थ्याशीं मुकाबला करूं शकेल अशी एकहि सत्ता जगांत नाही. तेव्हा आजचे आव्हान ही इतर लोकसत्तांना बिकट समस्या असली तरी अमेरिकेला ती समस्याच नाही. प्रश्न आहे तो उद्याचा, परवाचा, पंचवीस तीस वर्षांनंतरचा.
 हा प्रश्न का निर्माण झाला याची कारणें वर सांगितली आहेत. राजकारण, संघटित सभ्य डाकूगिरी, विवाहसंस्थेचा ऱ्हास, बालगुन्हेगारी, यांमुळे अमेरिकन समाजाची नीतिमत्ता, त्याची धर्मनिष्ठा, पार ढासळून गेली आहे. त्यामुळे लोकशाही मूल्ये नष्ट होत आहेत, आणि या कारणाने भावी काळाविषयी चिंता निर्माण झाली आहे; पण याविषयी निराश होऊन आजच निर्णय करावा असें कांही घडलें आहे असे मानण्याचें कारण नाही. अमेरिकन समाजाच्या धन व ऋण या दोन्ही बाजू विचारात घेतल्या तर धन ही ऋणावर मात करील असें वाटण्याजोगी अनेक लक्षणें, अनेक बलस्थानें आजहि दिसून येतात. त्यांचा विचार करून या प्रकरणाचा समारोप करूं.
 अमेरिकेत सभ्य डाकूगिरी व राजकारणी पेंढारशाही अगदी शिगेला पोचली असली तरी जॉन विल्यम्स, थॉमस स्मिथ, थॉमस ड्यूई यांसारखे धर्मनिष्ठ, चारित्र्यसंपन्न झुंजार वीर तेथे सारखे निर्माण होत असतात. धनलोभ, सत्तालोभ यांना बळी न पडतां, प्राण नित्य धोक्यांत असले तरी त्याचीहि पर्वा न करता, लोककल्याणार्थ नित्य संग्रामास सिद्ध असलेले ध्येयवादी शूर वीर ज्या समाजांत निर्माण होतात त्या समाजाला ढासळलेली नीतिमत्ता सावरण्यास फार वेळ लागेल असें वाटत नाही. अमेरिकन बहुजन हे पुष्कळच जागरूक व विवेकसंपन्न आहेत. ध्येयवादी नेतृत्व प्राप्त होतांच आपल्या संघटित सामर्थ्यानिशी त्याच्या मागे उभे राहण्याची बुद्धि