पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण दुसरें : ५९

अमेरिकेत संघटित बलाचा फायदा घेऊन कामगार आठवडयांत ठरलेले ४० तासहि काम करण्याचें टाळू लागले आहेत. हेन्री फोर्ड एकदा म्हणाला होता की, केल्या कामाचे दाम मोजणें, दर कितीहि महाग असला तरी परवडतें, त्यांत अंतीं फायदाच होतो. पण टिवल्याबावल्या करणें, उशीरा येणें, लवकर जाणें, आणि फोरमनला धाक दाखवून हजेरी पूर्ण दाखविणें, असल्या कामाचा पैसा द्यावा लागला तर कारखानदारांचे दिवाळें निघाल्याखेरीज राहणार नाही. मुद्दाम टाळाटाळ करून पगार भरपूर घेणें ही नवी अनीति आहे. पण चीन, भारत, इंडोनेशिया, इत्यादि पौर्वात्य राष्ट्रांत आळस, सुस्ती, दैववाद, हीन आकांक्षा यांमुळे काम न करतां सुस्तपणें पडून राहणे ही युगायुगांची अनीति आहे. या जनतेला पोटाला न मिळाले तरी चिंता वाटतच नाही. फार तर आजच्या भाकरीची ते विवंचना करतील. तेवढे कष्ट करतील. पण चार दिवसांच्या भाकरीची निश्चिति झाली की, त्यांनी कुदळ खाली ठेवलीच. थोड्या श्रेष्ठ जीवनाची आकांक्षा, जास्त सुखाची अभिरुचि, संस्कृतीची गोडी, हा भागच त्यांच्या जीवनांत नाही. त्यांना उद्या, परवा हे माहीतच नाहीत. ते फक्त आज जाणतात. त्यामुळे ही कोटिकोटि संख्येची जनता कष्टविन्मुख आहे. उत्साह, प्रयत्नशीलता, उदयोन्मुखवृत्ति, जिगीषा या वृत्ति त्यांना अज्ञात आहेत. निवृत्तीचें, निराशेचें, दैववादाचें तत्त्वज्ञान त्यांच्या हाडींमांशी खिळले आहे. त्यामुळे वर्षभर रोज ८-१० तास कष्ट हे त्यांना पाश्चात्त्य संस्कृतीच्या आगमनापूर्वी माहीतच नव्हते. चिनी नेत्यांनी यमदण्डाच्या साह्याने का होईना पण ६५ कोटि लोकांना कामाला लावलें ही त्यांची फार मोठी बहादुरी आहे. कष्ट करावे आणि खावें ही खरोखर श्रेष्ठ नीतिमत्ता होय.
 दण्डसत्तांनी आपल्या बहुजनांत प्रस्थापित केलेल्या या श्रेष्ठ मूल्यांमुळे त्यांनी लोकसत्तांना दिलेल्या आव्हानाला फार मोठा अर्थ प्राप्त होतो. नीतिमत्तेमुळे कोणत्याहि समाजाचें सामर्थ्य वाढत असतें, आणि पूर्वी सांगितलेल्या षडंगबलांनी संपन्न असलेल्या दण्डायत्त समाजांत याहि बलसाधनांची भर पडल्यामुळे त्यांचें सामर्थ्यं द्विगुणित किंवा दशगुणित होईल यांत शंका नाही. लोकसत्तांच्या नेत्यांनी याचा फारच गंभीरपणे विचार केला पाहिजे.