पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५८ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

तेथे निर्भयपणे हिंडूं शकते. 'भारत आणि चीन' या आपल्या पुस्तकांत उत्तर भागांत त्यांनी आपली दैनंदिनी दिली आहे. नवचीनच्या सीमा सोडून पुन्हा ब्रिटिश अंमलाखालच्या हाँगकाँगच्या हद्दींत ते आले. त्या वेळीं नवचीनचें जीवन व हाँगकाँगमधले जीवन यांत सभ्यता, संस्कृति, नीतिमत्ता या दृष्टींनी कसा जमीनअस्मानाचा फरक पडला आहे तें त्यांना जास्तच स्पष्ट दिसून आलें. हाँगकाँगमध्ये रात्रीचें जीवन- (नाइट लाइफ) त्याचा उन्माद, विलास, जुगार, दारू, नाच सर्व चालू आहे. रिक्षावाले चांगली मुलगी गांठून देतो, म्हणून गर्दी करीत आहेत. ऐश्वर्य, भपका, चैन, विलास! सर्वत्र हेच वातावरण. नवचीनमध्ये याचा मागमूसही दिसला नाही. तेथे गरिबी, दारिद्र्य आहे; पण सर्वत्र निग्रह, संयम, सभ्यता यांचें वातावरण आहे आणि हाँगकाँगमध्ये हें असें. तें पाहून त्यांच्या मनांत विचार आला, 'चारित्र्य आणि समृद्धि यांची अशी फारकतच राहावी काय?' डॉ. एस्. चंद्रशेखर हे भारत सरकारतर्फे चीनच्या लोकसंख्येच्या प्रश्नाचा अभ्यास करण्यास नवचीनला गेले होते. तेथे दण्डसत्ता आहे, व्यक्तिस्वातंत्र्य नाही, मानवी जीवनाला कसलीहि किंमत नाही, असे दिसल्यामुळे त्यांचें मत नवचीनबद्दल फारच प्रतिकूल झालें. तेथील शांतता म्हणजे स्मशान- शांतता आहे असें ते म्हणतात. पण चीनच्या नीतिमत्तेविषयी त्यांनीहि प्रशंसोद्गार काढले आहेत. खिसेकापू, डाकू, ठग, वेश्या तुम्हांला चीनमध्ये दिसणार नाहीत. चिनी जनता अत्यंत प्रामाणिक झाली आहे. वृत्तपत्रांचा गठ्ठा व शेजारीं पैशासाठी पेटी ठेवून विकणाऱ्याने दुसऱ्या कामास जाणे ही इंग्लंडच्या लौकिकाची गोष्ट चीनमध्ये शहरोशहरी दृष्टीस पडते. त्या पैशाला कोणी हात लावणार नाही. कोणी पत्र फुकट घेणार नाही. चिनी दुकानांत मोड मोजून घ्यावी लागत नाही, कारण तेथे कमी जास्त काही होणार नाही ही परक्यांचीसुद्धा खात्री झाली आहे (इलस्ट्रेटेड वीकली २५ जानेवारी ते १९ एप्रिल १९५९).
 चीनमधील श्रेष्ठ नीतिमत्तेचें सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे हें की, तेथे ६५ कोटि लोक आपल्या अन्नवस्त्रासाठी, उपजीविकेसाठी कष्ट करतात. चीनच्या कम्युनिस्ट नेत्यांनी ६५ कोटि लोकांना रोज ८-१० तास कष्ट करायला लावलें ही मानवी जीवनांतली अगदी अभूतपूर्व क्रान्ति होय.