पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण दुसरें : ५७

 ही शंका अत्यंत तीव्र स्वरूपांत पुढे उभी राहण्याचे आणखी एक कारण आहे. दण्डसत्तांनी लोकसत्तांचीं जीं बलसाधनें शास्त्रज्ञान, औद्योगीकरण, अद्ययावत् शस्त्रास्त्रे, समाजशिक्षण, राष्ट्रनिष्ठा, त्यांचीच उपासना केल्यामुळे त्यांना अत्यंत बलाढ्य लोकसत्तांनाहि आव्हान देण्याचें सामर्थ्य प्राप्त झालें आहे असें वर सांगितलें आहे. याहून विशेष गोष्ट अशी की, सोव्हिएट रशियाच्या व नवचीनच्या नेत्यांनी दण्डबलाच्याच साह्याने समाजाची पोखरण करणारी अनीति, भ्रष्टता, अनाचार, स्वैरवर्तन हीं पापबीजेंहि दग्ध करून टाकण्यांत यश मिळविलें आहे. जॉन स्ट्रॉम हे अमेरिकन पत्रपंडित आहेत. चीनमध्ये ४ महिने त्यांनी अनिर्बंध प्रवास केला. अमेरिकेविरुद्ध तेथे अत्यंत जहरी प्रचार चाललेला त्यांनी डोळयांनी पाहिला, कानांनी ऐकला. या द्वेषावरच नव्या पिढीच्या मनाचें पोषण होत आहे असें त्यांनी लिहिल्याचें मागे सांगितलेंच आहे. अर्थात् त्यांचें चीनविषयी अत्यंत प्रतिकूल मत आहे. असे असूनहि त्यांनी नवचीनमधील नीतिनिष्ठेविषयी प्रसंशोद्गारच काढले माहेत (रीडर्स डायजेस्ट, एप्रिल १९५९). ते म्हणतात की, "१९३७ साली मी चीनला गेलों होतों. तेव्हा भुरट्या चोऱ्यामाऱ्या ही गोष्ट तेथे नित्याचीच होती. आता चोऱ्या अजिबात नाहीशा झाल्या आहेत. मी चार महिने चीनमध्ये होतों, पण हॉटेलच्या खोलीला एकदाहि कुलूप लावले नाही. तरी कधी एक वस्तु इकडची तिकडे झाली नाही." त्याचप्रमाणे नवचीनमध्ये इतर देशांत सर्वव्यापी होऊन बसलेली, बक्षिसी, पोस्त ही पद्धत नांवालाहि दिसत नाही. एका चांभाराच्या मुलाने त्यांच्या बुटाला पॉलिश केलें आणि तीन पेन्स मजुरी सांगितली. स्ट्रॉम यांनी त्याला सहा पेन्स दिले. पण त्या पोराने तीन पेन्स परत दिले व तीन पेन्सची पावती दिली. शिवाय वर तो म्हणाला की, 'बक्षीस घेणें म्हणजे नवचीनचा अपमान आहे.' श्री. स्ट्रॉम यांना हाच अनुभव सर्वत्र आला. पौंडापर्यंतची बक्षिशीहि नाकारण्यांत आली. आपल्या नियोजन मंडळातर्फे चीनला गेलेले. श्री. रा. कृ. पाटील यांनी आपला असाच अनुभव सांगितला आहे. त्यांनी नवचीनमधील श्रेष्ठ नीतिमत्तेचें एक फारच उत्कृष्ट गमक सांगितलें आहे. कम्युनिस्ट दण्डसत्ता येण्यापूर्वी शांघायच्या रस्त्यांतून तरुण स्त्रीला संध्याकाळी हिंडणे कठीण होतें. आता अगदी मध्यरात्रीसुद्धा एकटी दुकटी स्त्री