पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५६ : लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान

दुर्गुणच रोमनांच्या नाशाला कारण झाले. इतर अनेक कारणे आहेत, पण ती गौण आहेत. विघटना आधीच झाली होती. नैतिक, आर्थिक, राजकीय कारणांनी साम्राज्य आधीच जर्जर झालें होतें. वैफल्य, निराशा, क्षुद्रता यांनी समाज आधीच ग्रासला होता. या दुगुणांमुळे दौर्बल्य येऊन साम्राज्याच्या तटबंदीला आधीच भगदाडें पडली होतीं. रानटी टोळ्या तेथूनच आंत घुसल्या; त्यांनी प्रलयकाळ जवळ आणला येवढंच." शेवटीं ड्युरँट याने इतिहासांतला एक फार मोठा सिद्धान्त मांडला आहे. "कोणतीहि थोर संस्कृति तिच्या अभ्यंतरांत विनाशबीजें निर्माण झाल्यावांचून केवळ बाह्य कारणांनी विनाश पावत नसते." (सीझर अँड ख्राइस्ट, पृष्ठ ६६५- ६६९)
 अमेरिकन समाजांत अशा तऱ्हेचीं विषबीजें आज स्पष्टपणे दिसत आहेत. आणि दुर्दैव असे की, व्यक्तिस्वातंत्र्य, व्यक्तिविकास या थोर तत्त्वांच्या पुण्याईखाली तीं अंकुरत आहेत. मागल्या शतकांत भांडवलशाहीने व्यक्तिस्वातंत्र्य, अनिर्बंध व्यवसायस्वातंत्र्य या नांवाखाली नंगानाच घातला होता. त्या वेळी आर्थिक क्षेत्रांत व्यक्तिस्वातंत्र्यावर बंधने घालावीं लागलीं, तशींच बंधने आता सामाजिक क्षेत्रांत घालणें अवश्य आहे, असें दिसूं लागले आहे. खरें म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्यावर बंधने घालणें अवश्य आहे, असें म्हणणें युक्त ठरणार नाही. गुंड, मवाली, डाकू यांनी तीं आधीच घातली आहेत. सभ्य, प्रामाणिक माणसाला त्यांच्या गुंडगिरीविषयीचें मत प्रकट करण्यास स्वातंत्र्य नाही. न्यायालयांत खरी हकीकत सांगण्याचें स्वातंत्र्य नाही. विधिमंडळांत कायदा करण्याचें स्वातंत्र्य नाही. आपल्या मुलांच्या मनांत हॉरर कॉमिक्समधील जंतु टोचावे की न टोचावे हें आईबाप ठरवू शकत नाहीत. म्हणजे मुलांना कसें वाढवावें हें ठरविण्याचें स्वातंत्र्य त्यांना नाही. गुंड मवाल्यांना, राजकारणी लोकांना मात्र वाटेल तें स्वातंत्र्य आहे. विवेकनिष्ठा समाजांतून गेली की, व्यक्तिस्वातंत्र्य हे गुंड मवाल्यांचें व्यक्तिस्वातंत्र्य आणि सज्जनांच्या स्वातंत्र्याचा अपहार असा अर्थ होतो. तो अर्थ अमेरिकेत कसा रूढ होत आहे तें वर दाखविलें. अशी समाजाची आंतून पोखरण झालेली असतांना दण्डसत्तांचे आव्हान लोकसत्ता स्वीकारूं शकतील काय, कशी शंका मनांत येणें साहजिक आहे.