पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण दुसरें : ५५

तेथल्या लोकशाहीला ही गुन्हेगारी म्हणजे मोठे आव्हान आहे असेंच तेथील शास्त्रज्ञ म्हणत आहेत.
 डेव्हिड लिलिएथल हे अमेरिकेतील मोठे विचारवंत गृहस्थ आहेत. 'टेनेसी व्हॅली ऑथॉरटी'चे ते अध्यक्ष होते. त्यानंतर ॲटॉमिक एनर्जी कमिशनचे ते अध्यक्ष झाले. त्या पदावर असतांना मिचिगन स्टेट कॉलेजमध्ये त्यांचे 'अमेरिकेच्या सामर्थ्याचं रहस्य' या विषयावर व्याख्यान झालें. त्या वेळी त्यांनी सांगितलें की, "आपल्या समाजाची नीतिनिष्ठा हा आपल्या लोकसत्तेचा खरा पाया आहे. आपली विवेकबुद्धि, आपल्या श्रद्धा हे आपलें खरें सामर्थ्य आहे. आपण अणुअस्त्रे तयार केली आहेत. त्याच खात्याचा प्रमुख म्हणून मी त्याचे महत्त्वहि जाणतों. पण केवळ संहार-सामर्थ्यालाच आपण आपलें खरें बळ मानूं लागलों तर तो भ्रम आहे. आपल्या समाजांत प्रत्येक नागरिकाची दुसऱ्याच्या सद्बुद्धीवर श्रद्धा आहे. ती जर ढळली तर शस्त्रास्त्रे कितीहि असली तरी आपण दुबळे होऊं. आपण दृढ बुद्धिवादी लोक आहों; ज्ञानाचे उपासक आहोंत. ही उपासना मंदावली तर आपली सुरक्षा ढासळेल. आपली विचारस्वातंत्र्यावर निष्ठा आहे, परमेश्वरावर श्रद्धा आहे. या आपल्या निष्ठा, या श्रद्धा लुप्त झाल्या तर आपला नाश ओढवेल. शस्त्रास्त्रे कितीहि असली तरी त्यांचा कांही उपयोग होणार नाही. मरण अटळ होऊन बसेल."
 एडवर्ड गिबन आणि विल ड्युरंट या दोन थोर पंडितांनी रोमन साम्राज्याच्या विनाशाची चिकित्सा केली आहे. 'डिक्लाइन अँड फॉल ऑफ दि रोमन एंपायर' हा गिबनचा ग्रंथ व 'सीझर अँड ख्राइस्ट' हा ड्युरँटचा ग्रंथ. दोघांनीहि अनीति, भ्रष्टता, समाजहितबुद्धीचा लोप, कमालीची विषमता, बेजबाबदारवृत्ति, स्वैराचार, श्रद्धाहीनता हेंच विनाशाचें प्रधान कारण दिले आहे. या साम्राज्याचा नाश रानटी टोळयांनी केला. गॉथ, व्हँडाल, हूण हे रानटी लोक आणि अलेरिक, अटिल्ला हे राक्षस त्यांचे सेनापति; या धाडी रोमवर कोसळल्यामुळे त्या प्रचंड साम्राज्याचा नाश झाला हें खरें; पण हें केवळ बाह्य कारण आहे. ड्युरँट म्हणतो, "रोमन लोकांनीच रोमन साम्राज्याचा नाश केला. अनीति, यादवी, अरेरावी, अधिकाऱ्यांची उर्मट बेजबाबदार वृत्ति, स्त्रियांची स्वैरता, व्यभिचार, हे