पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण दुसरें : ५३

कैद केलें होतें, आणि ही संख्या उत्तरोत्तर वाढतच आहे. दोन तरुण मुलांनी पेट्रोलचे डबेच रुळावरून घसरवून दिले. त्यामुळे आग लागून सहा लाखांचें नुकसान झालें. एका नऊ वर्षांच्या मुलाने एका कारखान्यास गंमतीने आग लावली. त्यामुळे १ कोटीची मालमता जळाली. या मुलांना पकडून समजुतीच्या गोष्टी सांगू लागलें तर ती उत्तर देतात की, आमचें जीवन चाहेल त्या पद्धतीने जगण्याचा आम्हांला हक्क आहे. या वाढत्या गुन्हेगारीचें कुटुंबसंस्थेचा नाश हे एक प्रधान कारण आहे, हें वर सांगितलेंच आहे; पण आणखीहि अनेक कारणें आहेत. ती म्हणजे सिनेमा, टेलिव्हिजन व हॉरर कॉमिक्स् हीं मासिकें. सिनेमा, रेडिओ, टेलिव्हिजन यांवर चांगल्या गोष्टींबरोबरच दरोडेखोरांच्या टोळ्या, त्यांचे नाईक, त्यांची धाडसी कृत्यें, खून, मारामाऱ्या, रक्तपात, लूटमार, अनाचार, हिडीस शृंगार, सूड यांनी भरलेल्या गोष्टी अलीकडे जास्त दाखवितात. त्यामुळे मुलांची मनें विकृत, विदीर्ण, भग्न होऊन जातात. शास्त्रज्ञ म्हणतात यामुळे मुलांची झोप नाहीशी झालेली आहे, मनें भीतीने ग्रस्त झालेलीं आहेत. कोणी दुबळी झाली आहेत, कोणी बेफाम झाली भाहेत. म्हणजे मूळ प्रकृति सर्वांचीच नष्ट झाली आहे. गुन्हेगारीचीं बीजें यांतच आहेत. हॉरर कॉमिक्स हा प्रकार सर्वात भयंकर आहे. 'माझ्या गांवांत महारोग आला तरी चालेल, पण हीं मासिकेँ नकोत' असें एका अमेरिकेतील नगरीच्या मेयरने म्हटले आहे. या मासिकांतून अगदी अनन्वित, अनर्थकारक गोष्टी असतात. एक दारुड्या एका तरुण मुलीला नग्न करून तिला चाबकाने फोडून काढीत आहे, अशी गोष्ट त्यांत चित्रासह देतात. एका स्त्रीच्या प्रेतावर तरुण अत्याचार करीत आहेत असें वर्णन सचित्र दिलेले आहे. अमेरिकेतल्या एका गांवच्या दहा मुलांनी आपल्यापैकीच एकाला रानात नेऊन प्रत्यक्ष फासावर चढविलें, आणि पोलिसांनी विचारल्यावर 'मासिकांतली गंमत आम्हीं करून पाहिली' असें सांगितलें. दुसऱ्या अशाच आठदहा मुलांनी शाळेतल्या तीन मुलींना रानांत नेऊन त्यांच्यावर वाटेल ते अत्याचार केले आणि पकडल्यावर तसेंच उत्तर दिलें. अमेरिकेत या मासिकांचा खप दरसाल अडीच कोटींचा आहे. हीं छापण्यास बंदी घातली तर ? मुद्रण- स्वातंत्र्य !