पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५२ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

अपत्यांची जवाबदारी आपल्यावर आहे, दोन कुटुंबांतल्या अनेक व्यक्तींचें सुखदुःख यावर अवलंबून आहे, ही व्यापक सामाजिक जबाबदारीची जाणीवच अमेरिकन स्त्रीपुरुषांच्या मनांतून लोपत चालली आहे. विवाह करतांनाच आज अनेकांची अशी वृत्ति असते की, 'नाही जमलें तर घटस्फोट आहेच!' म्हणजे बाजारांतून वस्तु विकत आणणें आणि विवाह करणें तेथे एकच झालें आहे. नाही पटली तर परत केली ! दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक जर्मन कुटुंबें अमेरिकेत आली. त्या कुटुंबांतील तरुण मुली अमेरिकन तरुणांना फार पसंत पडूं लागल्या; कारण असे की त्या मुली पति, संसार, मुलेबाळें यांत जास्त रमत, त्यांची त्यांना ओढ जास्त असे; आणि पुरुषाला बायको अशीच हवी असते, पण अमेरिकन तरुण स्त्रीला यांत आपल्या व्यक्तित्वाचा संकोच आहे असें वाटतें. यामुळे पुरुषाला ती तितकी प्रिय होत नाही. अशा गोष्टी अर्थातच फार थोड्या घडलेल्या असणार; पण तेथील कुटुंबसंस्थेला कीड कोणती लागली आहे हे यावरून धानी येईल. कुटुंबाला अवश्य त्या निष्ठाच अमेरिकेतून नष्ट होत चालल्या आहेत आणि, निष्ठा नाही म्हणजे कोणतीहि संस्था टिकत नाही.
 व्यक्तिस्वातंत्र्य, मुद्रणस्वातंत्र्य, संघस्वातंत्र्य, हक्काने मिळणारे अन्नवस्त्र, न्यायालयांत काटेतोलपणें मिळणारा न्याय हे सर्व लोकशाहीने मान्य केलेले मूलभूत हक्क आहेत; पण त्यावरोवरच विवेकनिष्ठा, समाजहितबुद्धि, अन्यायाचा प्रतिकार करण्याची वृत्ति, त्याग, धैर्य, दुसऱ्यांच्याहि हक्कांची जपणूक करण्याची दक्षता, शील, चारित्र्य ही थोर संपदा लोकशाहीने आवश्यक म्हणून सांगितली आहे. या परंपरेच्या अभावी पहिले हक्क जर एखाद्या समाजाने घेऊं म्हटलें तर ते अनर्थाला कारण झाल्यावांचून राहणार नाहीत. अमेरिकेत हेंच घडत आहे. तेथील सभ्य डाकू गिरी, तेथील राजकारण, तेथील भग्न कुटुंबसंस्था यांचा विचार आपण केला, तेथील बालगुन्हेगारीचा विचार केला तर हेच दिसून येईल.
 या बालगुन्हेगारीमुळे तर अमेरिकेतील समाजशास्त्रज्ञ, तत्त्ववेत्ते, शिक्षण- शास्त्रज्ञ अगदी हादरून गेले आहेत. कारण ही अत्यंत भयावह आपत्ति आहे. १९५१ साली १६ ते २४ वयाच्या अडीच लक्ष मुलांना चोरी, घरफोडी, आग, वाहनाच्या व इतर कायद्यांचा भंग यासाठी पोलिसांनी