पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण दुसरें : ५१

औदासीन्यामुळे ! याचा अर्थ असा की, श्रेष्ठ संस्कृतीमध्ये दौर्बल्य आणणारी जीं मूल्ये त्यांचा अमेरिकेने स्वीकार केला आहे. पण त्या संस्कृतींतली विवेकनिष्ठा, धर्मश्रद्धा, नीतिमत्ता, समाजहितबुद्धि हीं जीं सामर्थ्यदायक मूल्ये त्यांचा मात्र त्या समाजांतून हळूहळू लोप होत आहे.
 या अधःपाताचे आणखी एक कारण शास्त्रज्ञ सांगतात, तें म्हणजे विवाह- विच्छेद! अमेरिकेत विवाहसंस्था उद्ध्वस्त होत चालली आहे, आणि यामुळे अनेक अनर्थ घडून येत आहेत. पांच विवाहांपैकी दोन तेथे मोडतात, आणि त्यामुळे मानवी जीवनाच्या विकासाला, धर्मभावना, नीतिनिष्ठा यांच्या वाढीला अवश्य तें स्थैर्य अमेरिकेतून नष्ट झालें आहे. ज्यांचा विवाह भंगला त्या व्यक्ति व त्यांची मुलें यांच्या मनःस्थितीचा आपण विचार केला तर चोरी, डाकूगिरी, मनोविकृति, दौर्बल्य यांची अमेरिकेत झपाट्याने वाढ कां होत आहे हें सहज कळून येईल. पुरुषाची पत्नी दुसऱ्याकडे निघून गेलेली, मुलें वाऱ्यावर सोडलेली, त्यांना आई आहे तर बाप नाही, बाप आहे तर आई नाही, पुरुष गेल्यामुळे स्त्रीचा आधार गेलेला, अशा स्थितीत तेथले निम्मे अधिक नागरिक आहेत. द्वेष, मत्सर, निराशा, संताप यांनी ते नेहमीच ग्रस्त झालेले असणार. अशा स्थितीत दारू, जुगार, डाकू गिरी, व्यभिचार यांकडे त्यांची अधिकाधिक प्रवृत्ति होत गेली तर त्यांत नवल कसले ? विवाहसंस्था व कुटुंबसंस्था भंगल्यामुळे हे अनर्थ घडत आहेत यांत शंकाच नाही; आणि याचाच हा परिणाम आहे असे दिसून येईल. जरा कांही खुट्ट झालें की, अमेरिकन स्त्रीपुरुषांना घटस्फोटाला कारण पुरतें. कारण व्यक्तित्वाच्या अत्यंत विपरीत कल्पना आम्हीं शास्त्रज्ञांनीच अमेरिकन स्त्रीपुरुषांच्या मनांत भरवून दिल्या आहेत. त्याचीं फळें आम्ही आता भोगीत आहोत. वास्तविक मनुष्याने स्वतः होऊन आपणावर बंधनें घालणें याला स्वातंत्र्य म्हणतात. दुसऱ्याने बंधने घालणें हे पारतंत्र्य; पण बंधनेंच नसणें म्हणजे स्वातंत्र्य अशा विपरीत कल्पना समाजांत शिरल्या म्हणजे समाजाचा नाश होतो, आणि मग व्यक्तिस्वातंत्र्यहि जातें आणि समाजाचेंहि स्वातंत्र्य जातें. अमेरिकन नागरिकांच्या मनांत अशा विपरीत कल्पना दृढमूल होऊन बसल्यामुळेच त्यांची कुटुंबसंस्था कोसळत आहे. आपण विवाह केला की, एक सामाजिक जबाबदारी आपल्यावर येऊन पडते,