पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५० : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

आहेत. आता ते जेमतेम ३०|३२ तास काम करतात. पगार मात्र भरपूर घेतात. तेंच शिक्षकांचें, तेंच व्यापाऱ्यांचें, तेंच सर्वांचें. लोकशाही ही आपोआप व्यवस्थित टिकून राहण्याची कोणतीहि युक्ति परमेश्वराने सांगितलेली नाही. ज्यांची लोकशाहीवर निष्ठा नाही, जे तिच्यासाठी, लोकशाहीच्या तत्त्वासाठी वाटेल तो त्याग करण्यास सिद्ध नाहीत, त्यांची लोकशाही कधी टिकणार नाही. माणसें भ्रष्ट, अधम, उन्मार्गी झाल्यावर लोकशाही किती तग धरणार ? आपण अमेरिकन आपल्या हातांनीच आपल्या पूर्वजांनी प्रस्थापिलेल्या लोकसत्तेचा नाश करीत आहोंत- इत्यादि विवेचन करून शेवटीं शील, चारित्र्य, न्याय, स्वार्थत्याग, नीतिनिष्ठा हे लोकशाहीचे मूलाधार होत असें या लेखकाने सांगितले आहे.
 अमेरिकेच्या या अधोगामी प्रवृत्तीची अनेकांनी अनेक प्रकारें मीमांसा केली आहे. त्या सगळ्यांचा सारार्थ पाहिला तर एकच दिसेल की, लोकशाहीला जी श्रेष्ठ नीति आवश्यक असते, जी विवेकनिष्ठा आवश्यक असते तिचा त्या समाजांतून लोप होत चालला आहे. व्यक्तिस्वातंत्र्य हे अमोल धन असें समजतात. पण स्वतःच्या व्यक्तिस्वातंत्र्याइतकेंच दुसऱ्याचेंहि व्यक्तिस्वातंत्र्य महत्त्वाचें आहे हें जाणणें व त्याला तितकाच मान देणें याची जाणीव ज्यांना नाही, हा विवेक ज्यांना नाही त्या राजकारणी अमेरिकनांना व्यक्तिस्वातंत्र्याचे महत्त्व कळतें असें कसें म्हणावें? लोकशाहींत लोकहितबुद्धि हें प्रत्येक नागरिकाचे पहिले लक्षण असले पाहिजे. पण सामान्य शिपायापासून, सिनेटर, ॲटर्नी जनरल, न्यायाधीश येथपर्यंतचे लोक द्रव्यलोभाने किंवा भीतीने किंवा उदासीनतेने जेव्हा जनतेच्या हितावर निखारा ठेवतात आणि दरोडेखोरांचें राज्य चालूं देतात तेव्हा त्यांना लोकहितबुद्धि आहे असें कसें म्हणतां येईल ? विवेकाशिवाय व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे गुंडांनाच फक्त व्यक्तिस्वातंत्र्य, त्यांनाच सर्वाधिकार असा अर्थ होतो, आणि अमेरिकेची तीच स्थिति होत चालली आहे. बाहेरून दिसायला तेथे पूर्ण व्यक्तिस्वातंत्र्य आहे. अध्यक्ष, न्यायाधीश, सेनापति यांच्यावर तेथे कोणीहि टीका करूं शकतो. पण डोळ्यांदेखत तेथे अन्याय, दरोडेखोरी, अपहार, लूटमार चालूं आहे आणि त्यांवर तेथे कोणीहि टीका करूं शकत नाही. कोणी स्वार्थामुळे, कोणी भीतीमुळे, कोणी हितसंबंधामुळे, कोणी