पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण दुसरें : ४९

असते. याचें कारण असें की, राजकारणी नेत्यांकडून त्यांना अभय मिळालेलें असतें. स्मिथ यांच्या प्रयत्नामुळे हळूहळू लोकमत जागृत झालें आणि त्याचा परिणाम होऊन स्मिथ यांनी जवळजवळ ७० रॅकेट्सचा- प्रतिष्ठित डाकूंच्या टोळ्यांचा निःपात केला आणि १००- १५० नाइकांना तुरुंगात डांबले.
 अमेरिकेत दारूबंदीच्या काळांत सुरू झालेली ही डाकूगिरी- व्हाईट कॉलर क्राइम- थॉमस ड्यूई, ली स्मिथ यांसारख्या साहसी, निर्भय लोकसेवकांच्या प्रयत्नांमुळे तात्पुरती काय थंडावली तेवढीच, पण खरें पाहतां तिला तसा आळा पडलेला नाही. १९५० साली सीनेटने सीनेटर केफाव्हर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा अहवाल पाहतां हे स्पष्ट दिसून येतें. अजूनहि न्यूयार्क, शिकागो अशा मोठ्या शहरांत त्याच प्रमाणांत या डाकूंचीं सिंडिकेटस् आहेत. राजकारणी लोकांची व या दरोडेखोरांची युति अजून तशीच कायम आहे; आणि अमेरिकेतील कांही समाजशास्त्रज्ञांचें तर असें मत आहे की, आपली अर्थव्यवस्था व आपल्या सामाजिक संस्था अशाच आहेत तोपर्यंत अमेरिकन जीवनाच्या मोटर, बेसबॉल, ड्रगस्टोअर या कायमच्या लक्षणाप्रमाणेच ही सभ्य डाकूगिरी हेहि एक आपल्या जीवनाचें दुर्निवार असे लक्षण होऊन बसणार आहे. (यासंबंधीचें विवेचन 'सोसायटी इन् ट्रॅन्झिशन'- हॅरी बार्नेस, 'ब्रासचेक'- अप्टन सिंक्लेअर, 'दि चॅलेंज टु डेमॉक्रसी'- थिओडोर ब्लेच व जोसेफ बॉम गार्टनर, 'मॉडर्न अमेरिकन सोसायटी'- किंग्जले डेव्हिस इ. ग्रंथांत सापडेल. १९५८ च्या 'वसंत' दिवाळी अंकांत 'आपल्या लोकशाहीवरील नवे संकट' या लेखांत अमेरिकेतल्या या गुन्हेगारीचें बऱ्याच तपशिलाने मीं वर्णन दिले आहे. प्रस्तुत प्रकरणांतील सामान्य माहिती वरील ग्रंथांतून घेतली आहे. उदाहरणें 'रीडर्स डायजेस्ट' या सुप्रसिद्ध मासिकांतून घेतली आहेत.) थिओडोर ब्लेच यांनी तर ही गुन्हेगारी म्हणजे अमेरिकन लोकसत्तेला कायमचें आव्हान आहे, असें म्हटलें आहे. क्लाइड बेडेल या लेखकाने 'लुक ब्रदर, युअर हाऊस इज् ऑन् फायर' या नांवाची एक पुस्तिका काढून 'आपली लोकशाही रसातळाला चालली आहे' असा अमेरिकनांना इषारा दिला आहे. त्यांत त्याने असें दाखवून दिलें आहे की, अमेरिकन जीवनाचा प्रत्येक धागान् धागा अनीति, भ्रष्टता, दहशत, अरेरावी, यांनी कुजून गेला आहे, कामगार संघटित झाले
 लो. ४