पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रस्तावना : ३

आहे, पण यश मिळत नाही. अंतर्गत राष्ट्रीय प्रपंचांत अत्यंत हीन, अधम असा स्वार्थ आणि परराष्ट्रकारणांत अतिरेकी, बेगडी उदात्तता या दोन घातक प्रवृत्तींमुळे आपला नाश होत आहे.
 आणि यामुळेच भारताची लोकसत्ता यशस्वी होईल काय, अशी दारुण शंका मनांत उभी राहते. प्रारंभापासून राष्ट्रनिष्ठा (पूर्वपरंपरेची पूजा व भारताच्या शत्रूंचा प्रखर द्वेष) व विज्ञानपूत, समाजोन्मुख धर्मनिष्ठा यांची आपण जनतेंत जोपासना केली असती तर भारताची लोकसत्ता निश्चित यशस्वी झाली असती. पण दुर्दैवाने आपल्या राज्यकर्त्यांनी अत्यंत विपरीत व अराष्ट्रीय तत्त्वज्ञान स्वीकारल्यामुळे सर्व राज्ययंत्रणाच कर्तृत्वहीन, चारित्र्यहीन झाली आहे. तीच गोष्ट कायद्याच्या बजावणीची. कायद्याचें राज्य म्हणजेच लोकसत्ता. प्रारंभापासून काँग्रेस सरकारने अत्यंत काटेकोरपणें प्रस्थापित कायद्याची बजावणी केली असती, तरी भारताची लोकसत्ता अभंग राहिली असती. पण कायद्याची बजावणी हे दिसायला दोनच शब्द असले तरी त्याच्या मागे अखिल राष्ट्राचें चारित्र्य उभें असतें. त्याचाच येथे अभाव आहे. सध्या भांडवलवाले, कारखानदार, काळाबाजारवाले, करचुकवे, सरकारी अधिकारी आणि पांढरी टोपी घालणारे दादा यांनी कायदा विकत घेतला आहे. मग भारताची लोकशाही टिकणार कशी ?
 भारताचे स्वातंत्र्य टिकविण्याचेंहि सामर्थ्य आपल्या ठायीं नाही; मग लोकशाही टिकविणे कसें शक्य आहे ? रशिया, चीन यांनी लोकशाही स्वीकारली नाही, पण आपले स्वातंत्र्य अबाधित राखले आहे. त्यांच्या सरहद्दीचा भंग करूं शकेल अशी एकहि शक्ति जगांत नाही; आणि भारताच्या हद्दीत घुसण्यास भीति वाटेल असा एकहि देश जगांत नाही. हीं सर्व आपल्या गेल्या चौदा वर्षांच्या चारित्र्याचींच फळें आहेत. सत्ता हाती येतांच लोक- शिक्षणाची प्रचंड मोहीम आपण हातीं घेतली असती, स्वातंत्र्यपूर्व काळाप्रमाणे लक्षावधि त्यागी, निःस्वार्थी तरुण भारताच्या शहराशहरांतून, खेड्याखेड्यांतून, डोंगरदऱ्यांतून, गिरिकंदरांतून, राष्ट्रनिष्ठा, धर्मनिष्ठा, विज्ञाननिष्ठा यांचे संदेश देत, संस्कार करीत अहोरात्र विचरत राहिले असते, तर आज आपल्या लोकशाहीचा पाया भक्कम झाला असता आणि मग वरच्या मंदिराला तडे गेले नसते. पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर