पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

कोणत्या बळावर, कशाच्या आधाराने येईल, याचा विचार दुसऱ्या प्रकरणांत केला आहे. तिसऱ्या प्रकरणापासून शेवटच्या आठव्या प्रकरणाच्या अखेरपर्यंत भारतीय लोकसत्तेच्या सामर्थ्याचें मूल्यमापन केलें आहे.
 तिसऱ्या व चौथ्या प्रकरणांत भारतांतील चारित्र्यहीनता व अकार्यक्षमता यांचे स्वरूप दर्शवून भारताला जडलेल्या या दुर्धर रोगांची चिकित्सा केली आहे; आणि भारताने आखलेल्या योजना व डोळ्यांपुढे ठेवलेली उद्दिष्टें यांत जें अपयश येत आहे तें याच दोन अवगुणांमुळे येत आहे हें सरकारने नेमलेल्या ज्या अनेक समित्या, त्यांनी केलेल्या मूल्यमापनाच्या आधारेंच दाखवून दिले आहे.
 पण येथे असा प्रश्न निर्माण होतो की, भारताला हे दुर्धर रोग तरी कां जडावे ? या संबंधांतच कांही मूलगामी तात्त्विक विवेचन पांच, सहा व सात या प्रकरणांत केलें आहे. राष्ट्रनिष्ठा व धर्मनिष्ठा या महाशक्तींच्या आश्रयानेच सध्या सर्व राष्ट्र आपापला उत्कर्ष साधीत आहेत. इंग्लंड अमेरिकेसारखीं लोकसत्ताक राष्ट्रें व रशिया, चीन यांसारखी दण्डायत्त राष्ट्रे याच दोन शक्तींचा अवलंब करीत आहेत. दुर्दैवाने भारताने मात्र या महाप्रेरणांची अवहेलना, विटंबना चालविली आहे. याला महत्त्वाचें कारण म्हणजे आपला सत्तालोभ, स्वार्थ, अदूरदृष्टि आणि हीन अशी निवडणूकनिष्ठा हे होय. पांचव्या व सहाव्या प्रकरणांत हा विषय मांडला आहे. सातव्या प्रकरणांत आपल्या परराष्ट्रकारणाचा विचार केला आहे. त्यांतहि परराष्ट्रकारणाची चर्चा करावी हा उद्देश नाही. भारतीयांच्या प्रकृतींतल्या एका जुनाट रोगाचे स्वरूप वर्णावे हा त्यांत उद्देश आहे. धर्माचें स्वरूप निरपेक्ष असावें कीं (समाजाचा उत्कर्ष करील तो धर्म असें) उत्कर्षसापेक्ष असावे हा वाद फार प्राचीन आहे. दुर्दैवाने धर्माचे स्वरूप निरपेक्ष असावें असें तत्त्वज्ञान भारतांत पुनःपुन्हा प्रबळ होत असते. युधिष्ठिर, गौतमबुद्ध, मध्ययुगीन संत, महात्माजी हे या पंथाचे उपासक आहेत. धर्मासाठी धर्म, सत्यासाठी सत्य, अहिंसेसाठी अहिंसा अशी त्यांची धारणा आहे. याचा अतिरेक झाला की समाजाचा अधःपात होतो. सध्याच्या आपल्या परराष्ट्रकारणांत सत्यासाठी सत्य, पंचशीलासाठी पंचशील हें तत्त्व प्रबळ झाले आहे; आणि यामुळे जगांत आपल्याला कीर्ति मिळत