पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४८ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

थॉमस ड्यूई यांचे परमंमित्र ली थॉमसन स्मिथ यांचे या क्षेत्रांतलें कार्य फार मोठे आहे. स्मिथ हे एक सामान्य व्यापारी होते. एक दिवस केस कापण्यासाठी ते सलूनमध्ये गेले असतांना तेथे दोन सभ्य रॅकेटिअर आले. त्या नापिताला त्यांनी सांगितले की, 'नापितसंरक्षण संस्थेकडून आम्ही आलों आहों. तुम्ही केस कापण्याचा दर २५ सेंटचा ५० सेंट करा व संस्थेचें सभासद व्हा. प्रवेश फी १०० डॉलर्स आणि महिन्याची वर्गणी ४० डॉलर्स ही आत्ता द्या...' नापिताने मागणी नाकारली तेव्हा स्मितपूर्वक त्यांनी दोनचार गोष्टी सांगितल्या. 'अमक्याच्या दुकानाला आग लागली, तमक्याचा मुलगा नाहीसा झाला, हें होऊं नये म्हणून तर संरक्षणसंस्था आहे.' हे ऐकून स्मिथ अतिशय संतापले आणि त्या दोघांना त्यांनी बजावले की, 'अशी दमदाटी केलीत तर तुम्हांला तुरुंगांत घालीन, ते x x x मोठे पुढारी आहेत. त्यांचा माझा स्नेह आहे. ते तुमची गय करणार नाहीत.' यावर त्या सभ्य गृहस्थांनी स्मितपूर्वक सांगितलें की, 'त्यांच्याशी आम्ही कधीच समझौता केला आहे.' हें ऐकून स्मिथ थक्क झाले, आणि मग या प्रकरणी त्यांनी लक्ष घातलें तें काम त्यांना जन्मभर पुरलें. कारण या प्रतिष्ठित गुन्हेगारीचें जाळे सर्व राष्ट्रभर पसरलें आहे, असे त्यांच्या ध्यानांत आले; त्याच सुमारास ग्रँड ज्यूरीचे चेअरमन म्हणून त्यांची नेमणूक झाली. या ज्यूरीला फार मोठे अधिकार असतात. पण विल्यम डॉज, डिक्सन डेव्ही हे ॲटर्नी या दरोडेखोरांविरुद्ध काम चालवायला तयार होईनात. स्मिथ यांना रोज खुनाच्या धमक्या येऊ लागल्या; तरुण स्त्रियांना त्यांच्याकडे रात्रीं धाडून त्यांना बदनाम करण्याचे प्रयत्न झाले. तरी याचीहि त्यांनी पर्वा केली नाही. पण गुन्हेगारांच्याविरुद्ध कोणी साक्षीलाच उभे राहीनात. खाजगी रीतीने स्मिथ यांच्यापाशी वाटेल तें सांगण्यास लोक तयार असत, पण आम्ही साक्ष देणार नाही असें ते सांगत. कारण जीवाची भीति ! म्हणजे पैसा आणि दहशत असें दुधारी शस्त्र हे डाकू वापरीत. यानंतर एक पत्रक काढून स्मिथ यांनी लोकजागृति करण्यास आरंभ केला. पत्रकांत ते म्हणतात, "रॅकेटस ही प्रतिष्ठित डाकूगिरी अखिल राष्ट्राला ग्रासून राहिली आहे. या डाकूंना कोणाचीहि कसलीह भीति नाही. आपले कोणी कांही करूं शकणार नाही अशी त्यांची खात्री