पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४६ : लोकसत्तेला दण्डसत्तेचं आव्हान

जागे झाले. त्यांनी एक चौकशी समिति नेमली आणि हे सर्व प्रकार बाहेर येतांच त्या तिघांना बडतर्फ केले. आता तेथील शिक्षणव्यवस्था उत्तम आहे. पण मवाल्यांचा तो नंगा नाच चार वर्षे चालू होता.
 राजकारणी लोकांची ही प्रतिष्ठित दरोडेखोरी फार जुनी आहे. लोकशाहीच्या जन्माबरोबरच ती जन्मली आहे. पण तिला गेल्या ३०-४० वर्षांत अत्यंत उग्र, हिडीस व घोर रूप प्राप्त झाले. त्याचें कारण असे की, या काळांत पहिल्या जातीला, तसल्याच प्रतिष्ठित दरोडेखोरांची दुसरी एक जात येऊन मिळाली आहे, आणि ज्योतिषांत दोन पापग्रहांची युति झाली म्हणजे त्यांची फलितें जशी जास्त घातक होतात त्याचप्रमाणे अमेरिकेच्या सामाजिक जीवनांतील या दोन पापग्रहांची युति झाल्यामुळे अमेरिकन लोकशाहीला ती जास्तच घातक झाली आहे. हा दुसरा पापग्रह, प्रतिष्ठित दरोडेखोरांची ही दुसरी जात अमेरिकेतील दारूबंदीच्या काळांत आणि त्यातहि १९९८ ते १९३२ या काळांत उदयास आलेली आहे. बेकायदा दारू पुरविणाऱ्या लोकांच्या त्या वेळी टोळ्यांच्या टोळ्या निर्माण झाल्या आणि मारामाऱ्या रक्तपात, खून हे त्या वेळी नित्याचे प्रकार झाले. या टोळयांच्या नाइकांना त्या वेळी इतका अमाप पैसा मिळाला की, भांडवलदारांनी पूर्वीच्या काळांत मिळविलेला पैसा त्याच्या तुलनेने कांहीच नव्हे. अलकॅपोन हा त्या वेळी चोरट्या दारूचा बादशहा होता. त्याचें महिन्याचे उत्पन्न १२ कोटि रुपयांचें असे. हें धन पेरून तो साध्या शिपायापासून ॲटर्नी जनरलपर्यंत सर्वांना मिंधे करून टाकीत असे. अमेरिकन जीवनाला महारोग जडूं लागला तो या दारूबंदीच्या काळांत. कारण पुढे दारूबंदी उठली तरी या दरोडेखोरांच्या टोळ्या वरखास्त झाल्या नाहीत. त्यांनी आपला मोहरा सर्व व्यवसायांकडे वळविला. कापड, भांडी, किराणा, भुसार यांचे व्यापारी, हॉटेलवाले, परीट, न्हावी, अशा प्रत्येक व्यवसायाचें एक मंडळ (असोसिएशन) असतें, त्याचप्रमाणे अमेरिकेत या प्रत्येक धंद्याच्या लोकांकडून दहशतीने दरमहा बांधून पैसा वसूल करणारें एक दरोडेखोरांचे मंडळ असतें. दरमहा ठरलेले १००, २००, ५०० डॉलर्स दिले नाहीत तर कापडाच्या दुकानाला आग लागेल, हॉटेलच्या अन्नांत विष सापडूं लागेल, व्यापाऱ्यांचे ट्रक्स इष्टस्थळी पोचणार नाहीत. स्वातंत्र्याच्या,