पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण दुसरें : ४५

अधिकाऱ्याने हे यादीशुद्धीचें काम मोठ्या धैर्याने केलें. पुष्कळ वेळा खोट्या याद्यांच्या बाजूने गव्हर्नरासारखे उच्च पदावरचे अधिकारीहि उभे असल्याचे त्याला आढळून आलें.
 शिकागोच्या एज्युकेशन बोर्डात १९३४ साली असाच राजकारणी प्रकार घडला. त्याचें वर्णन करणारा लेखक फ्रँक एस्. मीड (रीडर्स डायजेक्ट नो. '४७) यानेहि ही प्रत्येक गांवाचीच कहाणी आहे असें प्रारंभींच म्हटले आहे. तो नागरिकांना उद्देशून म्हणतो, "तुम्ही शिक्षणाचा कर भरणें व मुलांची फी देणें यापलीकडे या क्षेत्रांत लक्ष घालीत नाही. जागरूक राहात नाही. त्यामुळे हा कारभार राजकारणी लोकांच्या हाती जातो." शिकागो एज्युकेशन बोर्डाचा कारभार असाच दोन राजकारण्यांनी हाताखाली घातला होता. हा कारभार म्हणजे ४० कोटींचा मामला होता. बोर्डाच्या नियंत्रणाखाली ४०० शाळा, साडेतीन लक्ष विद्यार्थी व १३००० शिक्षक होते. एडवर्ड केली हा शिकागोंतील राजकीय यंत्रणेचा दादा होता. तो स्वतः महापौर म्हणून निवडून आला. लगेच त्याने आपला मित्र मकॉहे याला एज्युकेशन बोर्डाचा अध्यक्ष केला, आणि त्याने आपला मित्र विल्यम जॉनसन याला सुपरिटेंडेंट ऑफ् स्कूल्स म्हणून निवडून आणलें, आणि मग यांनी अक्षरशः नंगा नाच घालण्यास सुरुवात केली. परीक्षक मंडळ त्यांनी ताब्यांत घेतलें आणि आपल्याला हवे तेच लोक पास होतील अशी व्यवस्था केली. त्यांनी पास केलेल्या लोकांतील शे. ८१ लोक लेखी परीक्षेत नापास झाले होते, पण तोंडी परीक्षेमध्ये मार्कांची खैरात करून यांनी त्यांना पास केलें. जॉनसन याचा एक क्लास असे. त्यांत नांव घालतील व अन्य तऱ्हेने निवडणुकांत साह्य करतील तेच लोक फक्त पास व्हावयाचे हें आता ठरून गेलें. बदली, बडतर्फी, यांचे त्यानंतर असें कांही सत्र सुरू झालें की, शिक्षक व नागरिक हैराण होऊन गेले. शिक्षणाला कांही रयाच राहिली नाही. कारण कालचे शिक्षक आज नाहीत, आजचे प्राचार्य उद्या नाहीत, असें नित्य होऊं लागलें. जॉनसन यांनी आपली व आपल्या संबंधितांची वीस पाठ्यपुस्तकें मंजूर करून घेतली. इतरांची सर्व काढून टाकली. अमेरिकेतल्या एका विख्यात नगरीतल्या साडेतीन लक्ष विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा या तीन राजकारणी मवाल्यांनी असा खेळखंडोबा करून टाकला. अर्थात् शेवटीं नागरिक