पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण दुसरें : ४३

अधिकारी ५०० लोकांनी भरलेला सारा दरसाल असा गिळंकृत करीत असे. तेथील एका स्त्री- कारकुनाने पुराव्यासह हें कलेक्टरपुढे मांडलें. पण तेथे तें प्रकरण दडपलें गेलें आणि त्या स्त्रीलाच ठपका मिळाला. जॉन विल्यम्स् यांनी त्यावर चौकशी समिति नेमली. तरी हा अधिकारी अगदी प्रामाणिक आहे असा कलेक्टर निर्वाळा देऊ लागले. प्रकरण आणखी पुढे गेलें तेव्हा तो पैसे भरण्यास तयार झाला, पण त्याला पाठिंबा देणाऱ्या वरच्या अधिकाऱ्याला शिक्षा तर नाहीच झाली, उलट बढती मिळाली! यानंतर न्यूयॉर्क, मिसूरी येथील महसूल खात्यांकडे विल्यम्स् वळले; आणि शेवटपर्यंत चिकाटी धरून त्या खात्यांतील घाणीचा त्यांनी उपसा केला. यांत ॲसि. ॲटर्नी जनरल बडतर्फ झाले, महसूल खात्याचे मुख्य कमिशनर यांनी राजीनामा दिला व तीस-चाळीस कमिशनरांना शिक्षा झाल्या. वॉशिंग्टनला असली प्रकरणें नित्य धाडली जातात; पण तेथेहि तीं दडपली जात असत. जॉन विल्यम्स् यांच्या या शुद्धीकरणानंतर त्याला कांहीसा आळा बसला. या प्रकरणांतील आपला अनुभव सांगतांना जॉन विल्यम्स् म्हणतात, "मला केवळ गुन्हेगार, भामटे, यांच्याशीच मुकाबला करावा लागला असें नाही, तर त्यांच्या मागले मोठे सरकारी अधिकारी व राजकारणी यांच्याशींहि लढा करावा लागला. ही सर्व भ्रष्टता, ही हीनता, हा अधमपणा, हा अपहार, ही लूट यांच्यावर पांघरूण घालण्याचा ते प्रयत्न करतात; आणि गुन्हेगाराला ते पाठीशी घालतात. प्रत्यक्ष भ्रष्टतेपेक्षा हें राजकारण जास्त घातक आहे." जॉन विल्यम्स् यांनी या प्रकरणी अपार कष्ट केले व सर्व घाण धुऊन काढली म्हणून त्यांचा अमेरिकेत मोठा गौरव झाला, पण त्यांना पदच्युत करण्याची मोहीमहि राजकारणी लोकांनी त्याच वेळी सुरू केली.
 १९३५- ३६ साली झालेलें अमेरिकेतील पेन्शन प्रकरण याच प्रकारचें आहे. किंबहुना जीवनाच्या सर्व क्षेत्रांतली सर्व प्रकरणें अशींच व याच प्रकारची आहेत. सरकारने किंवा कोणत्याहि संस्थेने कोणत्याहि सत्कार्यासाठी जो पैसा मंजूर केला असेल त्याचा ओघ आपल्या खिशाकडे वळविणें हा या राजकारणी लोकांचा धंदा. मग तें कार्य म्हणजे सर्वोदय असो, की सर्वनाश (युद्ध) असो. बालकाच्यासाठी दिलेला निधि असो, दुष्काळनिधि असो किंवा निराश्रित विधवांचें धन असो. राजकारण यांत भेदाभेद