पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४२ लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

त्या रोगाचें नांव राजकारण. या शब्दाचा अशा अर्थाने उपयोग व्हावा हें मोठे दुर्दैव होय; पण आज जगांत बहुतेक सर्व लोकायत्त देशांत राजकारण या शब्दाला असाच अर्थ प्राप्त झाला आहे. डॉ. जॉन्सन याने आपल्या कोशांतच पॉलिटिक्स या शब्दाचा अर्थ 'मवाल्यांचा धंदा' असा देऊन ठेवला आहे. दुर्दैवाने आज तो अर्थ अक्षरशः खरा होत आहे. लोकसत्ताक जगावर हें मोठें भयानक संकट आहे. राजकीय क्षेत्रांत न्याय्य मार्गाने सत्ता काबीज करणें व ती प्राप्त झाल्यानंतर समाजाचें उत्तम शासन करणें हा या शब्दाचा मूळ अर्थ; पण जगभर राजकारणी लोकांनी स्वार्थलंपट होऊन जे उद्योग चालविले आहेत त्यामुळे त्याला बरोबर उलट व विपरीत अर्थ प्राप्त झाला आहे. सूक्तासूक्त न पाहतां गुंडगिरी करून कोणत्याहि मार्गाने सत्ता काबीज करणें आणि ती हाती येतांच आपले इष्टमित्र, सगे- सोयरे, संबंधी यांच्या तुंबड्या भरण्यासाठी त्या सत्तेचा जास्तीत जास्त उपयोग करणें, नागरिकांची लूट करणें, आणि या स्वार्थाच्या आड येणाऱ्यांचा कांटा काढणे या अर्थी हल्ली राजकारण हा शब्द वापरला जातो. त्यामुळे अमेरिकेत पॉलिटिक्स, पॉलिटिशिअन हे शब्द शिवीसारखेच वापरण्यात येतात. अमेरिकेला या रोगाने किती ग्रासले आहे त्याची यावरून कल्पना येईल. पुढे आपल्याला भारतीय लोकसत्तेचा विचार करावयाचा आहे. ती दृष्टि ठेवून येथे जरा जास्त विस्ताराने अमेरिकेच्या या सामाजिक व्याधीचा विचार केला आहे.
 १९४६ सालची ही गोष्ट आहे. त्या वेळी जॉन विल्यम्स् हे एक सिनेटर होते. सारा भरण्यासाठी म्हणून त्यांनी विल्मिंटन- डेलावेअर येथील इंटर्नल रेव्हिन्यू खात्याच्या कचेरीत चेक पाठविला, तरी कांही दिवसांनी त्यांना सारा थकल्याची नोटीस आली. तेव्हा त्यांनी या प्रकरणी लक्ष घातलें, आणि मग प्रकरणांतून प्रकरण निघून सर्व अमेरिकेचें हें महसूल खातें किती भ्रष्ट आहे, कोट्यवधि रुपयांची अफरातफर तेथे कशी चालते, ही अफरातफर करणाऱ्यांच्या मागे अमेरिकेच्या ॲटर्नी जनरलपर्यंतचे अधिकारी कसे असतात आणि त्यांना सिनेटर, गव्हर्नर या राजकारणपटु लोकांचा पाठिंबा कसा असतो हे सर्व जॉन विल्यम्स यांना दिसून आलें. त्यांनी मग ही मोहीमच हातीं घेतली. विल्मिंटन ऑफिसमधील एक