पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण दुसरें : ४१

आसपास गेली आहे; आणि या शिकलेल्या विद्यार्थ्यांना पुढे व्यवसाय मिळवून देण्याची सोयहि सरकारने केली आहे. अमेरिकन सरकार दरसाल अब्जावधी रुपयांची कंत्राटें ठेकेदारांना देतें. तीं देतांना वर्णभेद पाळला जाणार नाही अशी अट घातलेली असते, आणि ती अट पाळली जाईल अशी दक्षता घेतली जाते. अमेरिकन सनदी नोकरींत आज शेकडा २४ नोकर निग्रो असून अध्यक्ष आयसेन होअर यांच्या कारभारांत वरच्या जबाबदारीच्या जागी आज तीनशें निग्रो आहेत. निरनिराळ्या उद्योगधंद्यांत व बौद्धिक व्यवसायांतहि निग्रोंचे प्रमाण वाढत असून ते तेथे गोऱ्या लोकांइतकेच यशस्वी होत आहेत. निग्रोंच्या २०० विमाकंपन्या आहेत, १४ पेढया आहेत, ३० सहकारी संस्था आहेत. यांत कोट्यवधि रुपयांची उलाढाल होत असून अनेक गोरे लोकहि त्यांत भागीदार आहेत. वृत्तपत्रे, कामगार संघटना, विमाव्यवसाय, शास्त्रसंशोधन, सरकारी समित्या, कारखाने अशा अनेक व्यवसायांत आज उच्चपदावर, ववचित् मुख्यपदावरहि निग्रो जाऊं शकतात आणि त्यांच्या हाताखाली शेकडो गोरे लोक काम करीत असतात. अमरिकेच्या लष्करांत कसल्याहि प्रकारचें वर्णवैषम्य नाही, आणि लिट्ल रॉक येथे पाठविलेले सैन्य अगदी पूर्ण मिश्र स्वरूपाचे होते ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. एवढ्यावरूनच आज निग्रोजातीयतेचा प्रश्न संपूर्ण सुटला आहे असे जरी म्हणतां येत नाही,- श्री. मिचेल तसें म्हणतहि नाहीत- तरी समाजसंघटनेला तडा जाईल, राष्ट्रीय सामर्थ्यांत वैगुण्य निर्माण होईल असें त्याचें रूप निश्चितच राहिलेले नाही. अमेरिकन नागरिकांच्या राष्ट्रीय दृष्टीचा हा मोठाच विजय आहे.
 अमेरिकेचे शास्त्रज्ञान, तेथलें औद्योगीकरण, त्यामुळे निर्माण झालेली अपार संपत्ति, भांडवलदारांनी विवेक जागृत ठेवून राष्ट्रहितदृष्टीने संपत्तीची थोडी न्याय्य वांटणी करण्याचे धोरण पत्करल्यामुळे तेथे प्रस्थापित होत चाललेली आर्थिक समता, त्याचप्रमाणे वर्णविद्वेष लुप्त करून अमेरिकन जनतेने मान्य केलेली वर्णसमता हें सर्व त्या राष्ट्राचें मोठें वैभव आहे यांत शंका नाही; आणि यामुळेच अमेरिकेला सर्व जगांत अग्रपूजेचा मान मिळत आहे. पण अलीकडे गेल्या ३०|४० वर्षांत या वैभवाला एक कीड लागत चाललेली आहे. एक फार मोठा रोग या वैभवाला ग्रासीत चालला आहे.