पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण दुसरें : ३९

केला पाहिजे. कंपनीचें उत्पन्न वाढले नसतांना पगारवाढ मागणें हें अंतीं कामगारांनाच घातक ठरतें; कारण तितक्या वस्तूंच्या किंमती वाढून बसतात, आणि न वाढल्या तर कंपनीचा तोटा होतो असा विचार अमेरिकेंतील कामगार नेते करूं शकतात. याला फार मोठा अर्थ आहे. कंपनीच्या कारखान्याच्या नफातोट्यांत त्यांचें हिताहित असावें इतकें या अर्थव्यवस्थेवर त्यांचे नियंत्रण सध्या आहे, हें स्पष्ट आहे. यामुळे सरकारी नियंत्रणास, सरकारी हस्तक्षेपास कामगारांचा अमेरिकेत विरोध आहे. ही खरी लोकशाही होय. कायद्याने केलेलें अर्थ नियोजन, म्हणजेच समाजवादी अर्थव्यवस्था अमेरिकेंत कामगारांनाहि नको आहे. याचा अर्थ असा की, कायद्याच्या दण्डावाचून भांडवलदारवर्ग संपत्तीची वाटणी करण्यास आपण होऊन तयार आहे. 'वर्गविग्रह समूळ नष्ट करण्याचा मार्ग' हेंच सेनेरॅझो यांच्या लेखाचें नांव आहे. (हाऊ टु किल क्लास स्ट्रगल - रीडर्स डायजेस्ट, सप्टें. १९४२) अमेरिकेत बहुसंख्य कामगारांच्या घरीं रेडिओ असतो, अनेकांना स्वतःची मोटर असते आणि या वर्गातील मनुष्य आता मंत्रिपदापर्यंत जाऊ शकतो हें आपण अनेक ठिकाणीं वाचतो. 'स्वतःच्या देशाचा पराभव घडवून आणणें हें कामगारांचे पहिले कर्तव्य होय' हा मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्यांचा उपदेश अमेरिकन कामगार कितपत मानतील हे यावरून दिसून येईल. वर्गविग्रहामुळे निर्माण होणारे भेद, विषमतेमुळे राष्ट्रसंघटनेस निर्माण होणारा धोका, कम्युनिस्टांच्या प्रचारामुळे समाजांत निर्माण होणारी बेदिली व यांतून निर्माण होणारें दौर्बल्य नष्ट करण्याचा अमेरिकेचा हा मार्ग आहे.
 'दि चॅलेंज टु डिमॉक्रसी' या नांवाच्या ग्रंथांत लेखक थिओडोर स्लेच व जोसेफ बॉब गार्टनर यांनी 'अमेरिकन कॅपिटॅलिझम मीट्स् दि चॅलेंज' या एका स्वतंत्र प्रकरणांत अमेरिकन भांडवलशाहीने लोकसत्तेचें हे आव्हान संपत्तीचा निचरा करून, कामगारांना सुस्थितीची राहणी देऊन कसें स्वीकारले याचें वर्णन केलें आहे. कामाच्या वेळाच्या हिशेबांत त्यांनी वस्तूंच्या किमती दिल्या आहेत त्या उद्बोधक आहेत. ३८ मिनिटांच्या कामांतून जो पैसा मिळतो त्यांतून कामगाराला १ पौंड मांस मिळू शकते. ३४ मिनिटाला एक डझन अंडी मिळतात, २३ मिनिटाला १ पौंड कॉफी मिळते. एका आठवड्यांत कामगार ४० तास म्हणजे २४०० मिनिटें