पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३८ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

सामर्थ्य हेहि एक प्रभावी कारण आहे. हॉरवर्ड विद्यापीठांतील अर्थशास्त्राचे प्राध्यापक समनर स्लीचर यांनी अमेरिकेतील या शांततामय क्रांतीचे चांगलें विवेचन केलें आहे. इंजिनीयर, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, तंत्रज्ञ, लेखक, संपादक, हिशेबनीस, व्यवस्थापक हा फार मोठा मध्यमवर्ग गेल्या ७५ वर्षांत निर्माण झाला आहे. या वर्गातील स्त्रियाहि आता व्यवसायांत उतरल्या आहेत. त्यामुळे सध्या या वर्गातील अनेक कुटुंबांचें मासिक उत्पन्न २५०० ते ५००० रु. पर्यंत असतें. १९३५ ते १९५० या पंधरा वर्षांत अगदी तळाशी असलेल्या लोकांपैकी अनेक लोकांची क्रयशक्ति शे. ७८ पर्यंत वाढली, तर शिखराशी असलेल्या धनिकांची क्रयशक्ति शे. १७ वाढली. अशा स्थितीत वर्गविग्रहाच्या धारा बोथट होऊन गेल्यास नवल नाही. शिक्षण हें सार्वत्रिक व मोफत झाल्यामुळे पूर्वीच्या कष्टकरी वर्गांतील अनेक लोक आता उच्चपदीं जाऊं शकतात. बहुतेक कांहीना कांही व्यवसाय वा तंत्र ते शिकतात. त्यामुळे केवळ हमाली करणारा वर्ग अमेरिकेतून नाहीसा होत आहे; आणि जो थोडा आहे तो अगदी दुर्मिळ झाल्यामुळे त्याला भरमसाट पैसे मिळतात. अमेरिकेत चांगल्या सधन कुटुंबालाहि हल्ली गडी वा मोलकरीण परवडत नाही, इतका त्यांचा पगार भारी झाला आहे. याच वर्गांत ९० टक्के लोक येऊन पडतील असें मार्क्सचें भविष्य होते. त्यांत सध्या शे. १० सुद्धा नाहीत.
 कामगारांची तर अमेरिकेत इतकी सुस्थिति आहे की अमेरिकेतील अत्यंत मोठ्या कामगार संघटनांचे एक अध्यक्ष वाल्टर सेनेरॅझो यांनी कंपनीच्या कारखान्याच्या हिताहिताची आपण काळजी वाहिली पाहिजे, पगारवाढ मागतांना कारखान्याला इतकी पगारवाढ परवडेल का नाही, याचाहि विचार आपण केला पाहिजे असा आपल्या अनुयायांना उपदेश केला आहे. याचे कारण काय ? अमेरिकेत अनेक कारखानदार सध्या कामगारांच्यापुढे हिशेब मांडून त्यांच्या सहकार्यानेच काम चालविण्याचें धोरण आखीत आहेत. भांडवलदार, व्यवस्थापक व कामगार हे कारखान्याचे तीन समबल घटक असून या पद्धतीला सहकारी भांडवलशाही म्हणावें असे सेनेरॅझो म्हणतात. जेव्हा जेव्हा पगारवाढ मागावयाची तेव्हा कामगारांनी आपली उत्पादनशक्ति आपण वाढविली आहे काय, याचा विचार आधी