पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण दुसरें : ३७

 अमेरिकेचें शस्त्रास्त्रबल, औद्योगीकरण व त्या राष्ट्राचे ऐहिक ऐश्वर्य यांचा विचार केला. पण मागे एके ठिकाणी सांगितल्याप्रमाणे लष्करी सामर्थ्यं एवढ्यावरच अवलंबून नाही. अत्यंत संघटित असें राष्ट्र हें लष्करी सामर्थ्याचें खरें लक्षण होय. त्याचा आता विचार केला पाहिजे. सामान्यतः आर्थिक, सामाजिक, धार्मिक इ. अनेक भेदांनी अनेक देशांत समाज छिन्नभिन्न झालेला असतो आणि राष्ट्रसंघटनेच्या आड हे भेद किंवा ही विषमता प्रामुख्याने येत असते. त्यांतील आर्थिक विषमता हें सर्वांत घातक असें जें भेदकारण त्याचा विचार आपण प्रथम करूं. दण्डायत्त देशांत ही विषमता असतेच. ती पराकोटीला पोचलेली असते. पण यमदण्डाच्या जोरावर तेथील नेते दरिद्री जनतेला नियंत्रणात ठेवून संघटना टिकवून धरीत असतात. अंधविभूतिपूजा हा त्यांचा दुसरा एक प्रभावी मार्ग असतो हे वर सांगितलेच आहे. लोकसत्तेला यांतल्या कोठल्याच उपायाचा अवलंब करता येत नाही. एकारलेल्या संपत्तीचा निचरा करणें, विषमता नष्ट करणें हा एकच उपाय येथे शक्य आहे. अमेरिकेने त्याचा अवलंब कसा केला तें पाहू.
 शंभर वर्षांपूर्वी मार्क्सने भविष्य करून ठेविलें होतें की, यापुढे भांडवलदारांची, धनिकांची श्रीमंती वाढत जाईल आणि कामकरी, शेतकरी हा जास्त दीन, दरिद्री होत जाईल आणि शेवटी या दोन वर्गांत कमालीची विषमता निर्माण होऊन त्यांतून भयंकर वर्गविग्रह निर्माण होईल. मार्क्सचें हें भविष्य खरें झालें असतें, तर आज जगांत कोठेहि लोकसत्ता दृष्टीस पडली नसती.
 असल्या विषमतेंत लोकसत्ता कधीच टिकत नसते. अमेरिकेत गेल्या शतकाच्या अखेरीस तशी परिस्थिति निर्माण झाली होती; पण अमेरिकन भांडवलदार, अमेरिकन मुत्सद्दी व नेते हे शहाणे आहेत. त्यांनी हळूहळ एकारलेल्या संपत्तीचा निचरा करून वर्गविग्रहाचा पायाच नष्ट करून टाकला. आज अमेरिकेत भांडवलदार वर्गाइतकेच मध्यम वर्ग व कामगार वर्ग प्रभावी आहेत. राष्ट्रीय जीवनावर, संस्कृतीवर, राजकारणावर तेहि धनिकांइतकेच वर्चस्व गाजवू शकतात. शिक्षणाचा प्रसार हें त्याचें एक कारण आहे, पण त्या शिक्षणामुळेच त्यांना प्राप्त झालेले धननियंत्रणाचें