पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३४ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

चिनी यांनी तोच प्रकार आरंभिला आहे. पण आम्हीं स्वीकारलेली सत्य, अहिंसा, मानवता, शांतता, अप्रतिकार, पंचशील, व्यक्तिस्वातंत्र्य, समता, बंधुता, जगत्कल्याण हीं उच्च मूल्येच आमचें रक्षण करतील अशी आमची श्रद्धा आहे. (पंडितजी, विनोबाजी, जयप्रकाशजी यांची भाषणे पाहा.) त्यामुळे आपण प्रस्थापिलेल्या लोकसत्तेला कोणी आव्हान देईल, तिला कशाची भीति आहे, असें आपल्याला वाटतच नाही. अमेरिकन शास्त्रज्ञ, तत्त्ववेत्ते, इतिहास पंडित, मुत्सद्दी यांचें मत निराळें आहे. श्रेष्ठ मूल्यांचे संरक्षण श्रेष्ठ संहारशक्तीने होतें असें त्यांना वाटतें.
 जेम्स मिचनेर या विख्यात अमेरिकन लेखकाने (व्हाइल अदर्स स्लीप) 'या निशा सर्वभूतानाम्' या आपल्या लेखांत अमेरिकेच्या स्ट्रॅटेजिक एअर कमांड (एस. ए. सी.) चें याच दृष्टीने वर्णन केलें आहे (रीडर्स डायजेस्ट जाने. '५८) सोव्हिएट रशिया लोकायत्त जगावर आक्रमण करील ही अमेरिकेला नित्य भीति वाटते. कारण आज रशियन नेते शांततेचीं भाषणे करीत असले तरी आक्रमक युद्ध, विश्वविजय, हे त्यांच्या जीवनाचें तत्त्वज्ञानच आहे. म्हणून या शत्रूची क्षणभरहि उपेक्षा करता कामा नये असें पाश्चात्त्य जगाचें निश्चित धोरण आहे. त्यासाठीच अमेरिकेने चार भिन्न ठिकाणी लष्करी तळ ठेवून तेथे बी ४७ जेट बॉबर विमानें, त्यांचे वैमानिक आणि प्रलयंकर अग्निगोल अहोरात्र, चोवीस तास सन्नद्ध स्थितींत ठेवलेले आहेत. अध्यक्षांची आज्ञा येतांच वीस मिनिटांत ही संहारदेवता आपले प्रलयनृत्य सुरू करील. इंधनासाठी मध्ये न उतरतां, एका दमांत पृथ्वीप्रदक्षिणा करतां येईल अशी या विमानांत व्यवस्था आहे. ताशी ५०० मैल वेगाने हीं धावतात; आणि दुसऱ्या महायुद्धांतल्या सर्व संहारशक्तींपेक्षा जास्त घातक शक्ति या एकेका विमानांत असते. अशी शंभर विमानें अमेरिकेने एकेक तळावर ठेविली आहेत. सोव्हिएट रशियाने हें सामर्थ्य जाणावें, त्याला याची संपूर्ण माहिती व्हावी अशीच अमेरिकेची इच्छा आहे. कारण यामुळेच या महाशक्तीचा उपयोग करण्याची वेळ येणार नाही व जगांत युद्ध अशक्य होईल अशी अमेरिकेची खात्री आहे. हीं अणुशस्त्रे कोणीच वापरू नयेत असा सोव्हिएट रशियाने प्रचार चालविला