पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण दुसरें : ३३

बुद्धिसामर्थ्याच्या जोरावर प्राप्त होणारें शास्त्रज्ञान, औद्योगिक धन व तज्जन्य श्रेष्ठ संहारसामर्थ्य यांची जोपासना जो समाज करतो त्यालाच रानटी शक्तीचे आव्हान स्वीकारतां येतें. तिच्यावर मात करतां येते. या दृष्टीने अमेरिकेच्या एकंदर सामाजिक राष्ट्रीय सामर्थ्याचा आता आपणांस विचार करावयाचा आहे.
 २१ मे १९५६ या दिवशी पहाटे अमेरिकेने पॅसिफिक महासागरांत एच्. बाँब प्रक्षेपणाचा प्रयोग केला. विल्यम लॉरेन्स या शास्त्रज्ञाने त्याचें प्रत्यक्ष पाहून केलेले वर्णन 'तिसरे महायुद्ध घडणें अशक्य आहे' या आपल्या लेखांत दिले आहे. त्यांत नेमका हाच विचार पुलिट्झर पारितोषिक मिळविणाऱ्या या शास्त्रज्ञाने मांडला आहे. हा अग्निगोल म्हणजे अमेरिकेची व एकंदर लोकायत जगाची संरक्षक ढाल आहे, असें तो म्हणतो. याचे कारण असें की, या अग्निगोलाच्या ठायीं प्रलयंकर संहारसामर्थ्य आहे. कांही शास्त्रीय हिशेब देऊन त्याने असें दाखविलें आहे की, दुसऱ्या महायुद्धांत प्रारंभापासून अखेरपर्यंत जेवढे अग्निगोल टाकले गेले त्याच्या पांचपट संहारशक्ति या एच्. बाँबची आहे. नागासाकीवर टाकलेले ॲटमबाँब या अग्निगोलापुढे केवळ ठिणग्या होत. या गोलाच्या ठायीं असें प्रलयसामर्थ्य असल्यामुळेच जगाला प्रलयाचे आता भय नाही असें हा लेखक म्हणतो. कोणाहि आक्रमकाला अमेरिकेवर आक्रमण म्हणजे केवळ आत्मघात आहे हें यावरून सहज ध्यानांत येईल; आणि यामुळेच जगाचें संरक्षण करण्यास, युद्धकल्पना अशक्य करून टाकण्यास हा अग्निगोल समर्थ आहे असें विल्यम लॉरेन्स याचें मत आहे.
 अमेरिकेतल्या इतर अनेक लेखकांनी अशाच तऱ्हेचे विचार प्रकट केले आहेत. त्यावरून हें ध्यानांत येईल की, उच्च सांस्कृतिक मूल्ये स्वतःच आत्मरक्षणाला समर्थ असतात, असला भ्रम अमेरिकेला नाही. भारताला असा भ्रम नित्य होत असतो. किंबहुना भारताची ही एक कायमचीच व्याधि आहे व तिच्यामुळेच तो कायमचा जर्जर व पंगु होऊन बसलेला आहे. रस्त्याने चाललेल्या अबलेची कोणीहि टवाळी करावी, कोणीहि तिचा पदर ओढावा, कोणीहि तिच्यावर अत्याचार करावा अशी गेलीं हजार वर्षे भारताची स्थिति आहे. अरब, अफगाण, मोंगल, तार्तर, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज यांनी आतापर्यंत हेच केलें आहे; आणि आता पाकिस्तानी,
 लो. ३