पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण दुसरें : ३५

आहे; आणि आपण शांततावादी आहों, असें तो भासवीत आहे. पण असें केल्यास, या परमोदार तत्त्वाला अमेरिका बळी पडल्यास. जगाचा निश्चित नाश ओढवेल असें तेथील नेत्यांचे मत आहे. लोकायत्त देशांतील श्रेष्ठ मूल्यांचे रक्षण करण्यास दुसरे कोणतेंहि साधन सध्यातरी आपल्याजवळ नाही, असें लेखाच्या शेवटी मिचनेरने बजावलें आहे.
 पॉल पामर या लेखकाने अमेरिका व रशिया यांच्या बलाविषयी अमेरिकेच्या तीन मोठ्या लष्करी अधिकाऱ्यांची मुलाखत घेतली. अमेरिकेच्या नौदलाचे प्रमुख ॲडमिरल बर्क, विमानदलाचे उपसेनापति जनरल ली मे व ॲटॉमिक एनर्जी कमिशनचे अध्यक्ष लेविस स्ट्रास हे ते अधिकारी होत. तिघांच्याहि मतांचा इत्वर्थ असा की, सोव्हिएट रशियाशी नजीकच्या भविष्यकाळांत युद्ध उद्भवण्याचा संभव नाही; कारण आपले लष्करी सामर्थ्य कोणत्याहि आपत्तीला तोंड देण्यास पूर्ण सिद्ध आहे. तें क्षीण झालें तर मात्र युद्ध अटळ आहे. रशियाची प्रगति कौतुकास्पद आहे हें खरें. शास्त्रांत, औद्योगिक उत्पादनांत, व कांही प्रक्षेपणास्त्रांत त्याने अलीकडे खूपच भरारी मारली आहे; पण आपली बरोबरी करण्यास त्याला अजून फार काळ लागेल. मात्र आपण नित्य डोळयांत तेल घालून जागे राहिलें पाहिजे; कारण लोकशाही जगाशी रशियाचें उभें हाडवैर आहे. तें त्याने बोलून दाखविलें आहे; आणि आपल्या जनतेला कायमचे युद्धोन्मुख करून ठेवणें हें त्याचें धोरण आहे, म्हणून आपल्याला लढाई गृहीत धरून सन्नद्ध, सुसज्ज राहिलें पाहिजे.
 लष्करी सामर्थ्य, संहारशक्ति यांचा विचार झाल्यावर पामरने दुसरा प्रश्न या अधिकाऱ्यांना विचारला. नेहमी सन्नद्ध व सुसज्ज राहावयाचें तर त्या दृष्टीने अमेरिकन जनतेला आपल्या जीवनांत कांही बदल करावा लागेल काय ? रशिया सर्व शक्ति लष्करी निर्मितीवर केंद्रित करतो, जीवनधन पुरेसें निर्माण करीत नाही. त्यामुळेच त्याला कांही क्षेत्रांत आघाडी मारता आली असें आपण म्हणतां मग आपल्यालाहि तोच मार्ग अनुसरावा लागेल काय ? आपल्याला अर्वाचीन स्पार्टा व्हावें लागेल काय ? आपले जीवन आज सुखी व समृद्ध आहे, आणि व्यक्तिस्वातंत्र्याचें वैभवहि आपल्याजवळ आहे. अफाट लष्करी खर्च पेलण्यासाठी आणि इतर दृष्टींनी आपल्याला या पातळीवरून खाली येणें अवश्य आहे काय ?