पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३२ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

बुद्धिनिष्ठा, विवेकनिष्ठा निर्माण होते ती पुरेशी प्रबल झाली तर व्यक्तिस्वातंत्र्यामुळे समाज छिन्नभिन्न होत नाही. ब्रिटनमध्ये युद्धकाळांतहि युद्धविरोधी प्रचारास मुभा होती. पण असा प्रचार कितीहि झाला तरी सर्व राष्ट्राने तसा विचार निश्चित करून पार्लमेंटमध्ये तसा ठराव करीपर्यंत एकहि ब्रिटिश नागरिक रणांगण किंवा युद्धकार्य सोडणार नाही ही ब्रिटिश अधिकाऱ्यांना खात्री असते. म्हणूनच त्यांना इतरांप्रमाणे व्यक्तिस्वातंत्र्याची भीति वाटत नाही. ब्रिटिश लोकांच्या या विवेकनिष्ठेमुळेच, उच्च मूल्यांमुळे येणारी दौर्बल्यें त्या समाजांत शिरत नाहीत. स्थिरजीवनांतून संस्कृति जोपासली जाते व त्यांतूनच बुद्धीची वाढ होते. ही बुद्धि मनुष्याला मुत्सद्देगिरी, रणपांडित्य, विज्ञान व तज्जन्य श्रेष्ठ मारक हत्यार प्राप्त करून देते; आणि रानट्यांच्या उपजत शौर्यधैर्यावर सुसंस्कृत मनुष्याला बुद्धिबळाने सहज मात करतां येते. यावरून असें दिसतें की, उच्च मूल्यांमुळे येणारें दौर्बल्य नष्ट करण्याचे उपाय उच्च संस्कृतींतून, उच्च मूल्यांतूनच साध्य होत असतात. जे समाज सावध राहून त्यांचा अवलंब करतात त्यांना हीनमूल्य रानटी समाजाची भीति बाळगण्याचें कांहीच कारण नसतें. पण हिंदूंसारखे जे समाज व्यक्तिस्वातंत्र्याबरोबर विवेकनिष्ठा, नीतिमत्ता यांची जोपासना करीत नाहीत, संस्कृतीमुळे येणाऱ्या शरीर- दौर्बल्याची, श्रेष्ठ मारक हत्यार, श्रेष्ठ संहारक शक्ति शोधून, जे समाज भरपाई करीत नाहीत, विभूतिपूजा, अंधनिष्ठा यांचा त्याग करतात, पण त्यामुळे गेलेलें सामर्थ्य बुद्धिनिष्ठ धर्मतत्त्वांचा अवलंब करून परत प्राप्त करून घेण्याची व्यवस्था जे समाज करीत नाहीत, अहिंसा, भूतदया मानवता यामुळे येणारी मृदुता व तज्जन्य प्रतिकारशक्तींची कमतरता श्रेष्ठ संघनीतीने जे नाहीशी करीत नाहीत ते समाज हीनमूल्य रानटी समाजाच्या आक्रमणाला सहज बळी पडतात. संस्कृतीमुळे धनैश्वर्य वाढत जातें, पण त्याच वेळी संयम, जितेंद्रियवृत्ति, निग्रह हे थोर गुण बाणवण्याची काळजी घेतली नाही तर समाज नाश पावतो. या सगळ्याचा अर्थ असा की, उच्च मूल्यांमुळे, श्रेष्ठ संस्कृतीमुळे लढाऊ लष्करी सामर्थ्यात उणीव निर्माण होते हे जाणून त्या श्रेष्ठ संस्कृतींतूनच निर्माण होणारे धर्मनिष्ठा, नीतिनिष्ठा, संघविद्या, विवेकबल हे गुण व संस्कृतींतूनच प्राप्त होणाऱ्या