पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण दुसरें : ३१

पाऊस, ऊन सोशीत असतात. साहजिकच ते जास्त काटक, बळकट व टणक असतात. त्यांच्या तुलनेने स्थिरजीवनांत प्रवेश करणारे शेतकरी शरीरबळांत कमीच पडणार. दुसरें असें की, शेती, घरदार, प्रपंच करून स्थिर जीवनांत राहणाऱ्या समाजाला त्या जीवनांत कांही भावबंध निर्माण झालेले असतात. कांही आशाबंध, कांही लभ्य, कांही संरक्षणीय निर्माण झालेलें असतें. म्हणून त्यांतील व्यक्तींच्या प्राणांची किंमत वाढलेली असते. भटक्या जीवनांत यांतलें कांहीच नसतें. शेतकीची चांगली मशागत करून ती जिंदगी आपल्या मुलाला ठेवावी अशी किंवा या तऱ्हेची ओढ भटक्यांना मुळीच नसते. त्याचें घरदार सर्व बरोबरच. अपत्यांना वाढविणे, त्यांना शिक्षण देणें व मिळविलेल्या धनाचा व संस्कृतीचा वारसा त्यांना ठेवणें हा स्थिर जीवनांतला प्रकार त्यांना माहीतच नसतो. शाश्वत लभ्य, संरक्षणीय असें त्यांना कांहीच नसतें. त्यामुळे ते किसानवृत्ति मनुष्यापेक्षा प्राणावर जास्त उदार असतात; आणि जो प्राणावर उदार तो जास्त शूर हा तर युद्धशास्त्रांतला पहिला सिद्धान्त आहे. संस्कृति आली की, प्राणाची किंमत वाढते व त्यांतूनच दौर्बल्य निर्माण होतें. महाभारतांत म्हटल्याप्रमाणे जे 'जीवितेषु निराश' ते खरे बलसंपन्न, ते पराक्रमी. त्यांच्यापुढे लढाईंत कोणीच टिकत नाही.
 पण संस्कृतीमुळे, उच्च तत्त्वामुळे येणारें हें जें दौर्बल्य, शौर्य साहसांत त्यामुळे येणारी जी उणीव, ती भरून काढण्याची साधनें सुदैवाने संस्कृतीतूनच हाती लागतात. घरदार, शेती, प्रपंच, अपत्यें यांचा पाश नसल्यामुळे रानटी मनुष्य जास्त शूर होतो हें खरें पण या प्रपंचावरचें मनुष्याचें प्रेम अत्यंत उत्कट झाले, प्राणार्पण करूनहि त्याचें रक्षण केलें पाहिजे अशा कोटीला हे प्रेम, ही भक्ति गेली तर त्या भक्तीमुळेच मनुष्य रानटी माणसा- इतका किंवा त्याच्यापेक्षाहि जास्त शूर होतो. धर्म, नीति यांच्या संस्काराभावी रानटी मनुष्य स्वभावतःच क्रूर असतो व अचाट साहसी कर्माला तो नेहमीच सिद्ध असतो. पण सुसंस्कृत समाजांत धर्मनिष्ठाच इतकी प्रबल करतां येते की, त्या धर्मरक्षणासाठी रानट्यांपेक्षा दसपट साहसी कर्मे करण्यास मनुष्य सिद्ध होतो. व्यक्तिस्वातंत्र्य, संघस्वातंत्र्य या उच्च मूल्यांचे असेंच आहे. यांनी भेद बळावण्याचा संभव आहे हें खरें; पण यांतूनच जी