पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३० : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

असे असून आज सोव्हिएट रशियाचे अधिकृत इतिहासकार सांगतात की, रशियाने जपान आधीच जिंकून जमीनदोस्त केला होता. ॲटमबॉब टाकण्याची जरुरी नव्हती. रशियाच्या हातचें यश लाटण्याच्या हेतूनेच अमेरिकेने हे बाँब टाकले. आता हा सत्यापलाप ब्रिटन-अमेरिकेत क्षणभरहि टिकणार नाही. तेथील राजकारणी लोक एखादे वेळी असा अपलाप करण्याचा प्रयत्न करतील, पण तेथील इतिहासकार व तत्त्ववेत्ते त्यांचे वाभाडे काढल्यावांचून राहणार नाहीत. मागल्या काळांत व्यक्तिस्वातंत्र्य पूर्णतेस गेलें नव्हतें त्या वेळी सुद्धा बर्कने वारन् हेस्टिग्जला नको जीव करून टाकले. मग आज तर काय होईल याची कल्पनाच केलेली बरी. पण रशियांत हें विधान जनतेने पूर्ण श्रद्धेने स्वीकारलेले आहे. स्वीकारणें तिला भागच आहे. यावर तिच्या अहंकाराचा पोष होतो. आपण जपानचा पराभव केला या विश्वासाने तिचें सामर्थ्य वाढतें हें उच्चमूल्याश्रयी लोकायत्त राष्ट्रांना कसे शक्य आहे ! १८५७ चें बंड हें स्वातंत्र्ययुद्ध होतें, या विधानाची टवाळी हिंदी विद्वान् करू शकतात. हे रशियांत शक्य नाही. यावरूनहि हैं स्पष्ट होईल की, अंधश्रद्धेने, असत्याने अहंकार पोसणें हें सुसंस्कृत देशांत शक्य नाही. म्हणजे आणखी एक बलसाधन गेलें.
 उच्च संस्कृतीचें रक्षण व त्याबरोबरच संरक्षणसामर्थ्याची जोपासना हे कसें साधावें हा प्रश्न आज लोकायत्त राष्ट्रांपुढे नव्यानेच आला आहे असें नाही. मानवसमाजांत संस्कृतीचा उदय झाला तेव्हापासूनच ही समस्या त्याच्यापुढे येऊन पडलेली आहे. संस्कृतीच्या वरच्या पायरीवर गेलेल्या समाजांचा रानटी टोळ्यांनी नाश केल्याची कितीतरी उदाहरणें मागल्या इतिहासांत आहेत. याचेंहि कारण हेंच आहे. उच्च मूल्यांचा स्वीकार केल्याबरोबर समाजाचें लढाऊ सामर्थ्य निश्चित कमी होते; आणि ही उणीव अन्य उपायांनी भरून काढण्याची सावधगिरी जे समाज घेत नाहीत त्यांचा नाश होतो. सुधारणेची पहिली पायरी म्हणजे कृषि व पशुधन यांनी प्राप्त होणारें स्थिर जीवन ही होय. पण हें येतांच माणूस घरांत राहू लागतो. थोडे बरे कपडे करतो, थोडा मृदु मनाचा होतो. जनावरावरहि त्याची माया जडते. कुटुंबप्रेम हें तर त्याच्या सर्व संस्कृतीचें सार असतें. उलट भटक्या स्थितीत राहणारे लोक नित्य थंडी, वारा,