पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण दुसरें : २९

की, त्या वेळी ब्रिटन, अमेरिका या देशांतील कामगारांनी संप करून उत्पादन बंद पाडण्याची धमकी दिली. लोकशाहीचीं उच्च मूल्यें स्वीकारलेल्या या देशांना त्या वेळी माघार घ्यावी लागली. हें उदात्त तत्त्वांमुळे आलेले दौर्बल्य होय. अत्यंत जहाल व आक्रमक राष्ट्रवादाचा प्रचार करून नागरिकांचीं मनें परकीयांच्या द्वेषावर सतत पोशीत राहणें, त्यांना सतत युद्धोन्मुख करून ठेवणें, ही गोष्ट कोणत्याच दृष्टीने श्रेयस्कर नाही. पूर्वपरंपरेचा अभिमान नित्य जागृत ठेवणें, प्राचीन थोर विभूतींची सतत पूजा करीत राहणें हें युक्त व इष्ट आहे. पण माणसें खरी धुंद व पिसाट होतात तीं या अभिमानाला द्वेषाची जोड मिळेल तेव्हा ! तसें करणें हें संस्कृतीच्या वरच्या पातळीवर गेलेल्यांना फारसें शक्य होत नाही. पण मग माणसें व्हावी तितकी अविवेकी, बेहोष, धुंद व पिसाट, म्हणजेच युद्धोन्मुख होत नाहीत; आणि जो पिसाट नाही तो बहुधा बलहीन असतो. दण्डायत्त कम्युनिस्ट देशांत अशा उच्च संस्कृतीचा प्रश्नच नाही. त्यांनी अहोरात्र युद्धपिपासा जागृत ठेवण्याचेंच धोरण ठेविलें आहे. मार्क्सवादाचें मूलतत्त्वच संग्राम, द्वंद्व हे आहे. क्षणकाल सोव्हिएट नेते, युद्ध नको म्हणत असले, शांततावादाचा पुरस्कार करीत असले तरी तो एक राजकारणांतला डावच होय. एरवी परक्यांचा द्वेष, युद्ध या कल्पना हीच त्यांची प्रकृति आहे.
 पराकाष्ठेची अंध विभूतिपूजा हें एक सामर्थ्यकारण आहे. सोव्हिएट नेत्यांनी ती कोणत्या थराला नेलेली आहे हें वर सांगितलेच आहे. व्यक्तिस्वातंत्र्य संपन्न, लोकायत्त देशांत अशी पूजा कालत्रयीं शक्य नाही. बुद्धिवाद हें अत्यंत मोठे मूल्य तेथे समाजरचनेला पायाभूत झालेलें असतें. अंध व्यक्तिपूजेचा तेथे नुसता वास आला तरी शास्त्रज्ञ, ग्रंथकार, तत्ववेत्ते हे उसळून उठतीलच. पण ब्रिटन-अमेरिकेत सामान्य जनताहि संतापून उठेल. याचाहि अर्थ हाच की अप्रगत, अज्ञ, रानटी समाजांतील एक बलसाधन उच्च मूल्यांच्या स्वीकारामुळे सुसंस्कृत समाजाच्या हातांतून नाहीसें झालेलें असतें. सत्य, प्रखर शास्त्रीय सत्य, हे सुसंस्कृत समाजाचे ध्येय असतें. सत्यापलाप त्याला चालत नाही. १९४५ साली अमेरिकेने ६ ऑगस्टला हिरोशिमावर ॲटमबाँब टाकले. रशियाने जपानशीं युद्ध पुकारलें तें ८ ऑगस्टला. म्हणजे त्यापूर्वीच जपानचे प्रतिकारसामर्थ्य नष्ट झालें होतें.