पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२८ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

अनेक कारणांनी कमी होते असा इतिहासाचा सिद्धान्त आहे. अमेरिकेचेच उदाहरण पाहा. उद्या सोव्हिएट रशियाशी या राष्ट्राचे युद्ध जुंपलें तर अमेरिकेतील कम्युनिस्ट निश्चित स्वदेशाविरुद्ध प्रचार करणार, ते युद्ध साम्राज्यवादी म्हणून शिक्का मारून ते भेद माजविणार, पण मतस्वातंत्र्य, मुद्रणस्वातंत्र्य या उदात्त मूल्यांमुळे अमेरिका हा प्रचार बंद करूं शकणार नाही. अमेरिकेतील कम्युनिस्ट राष्ट्रद्रोही कारस्थानेंहि करणार, रशियाला गुप्त वार्ता पुरविणार ! आता याला शिक्षा आहे. पण तो गुन्हा न्यायालयांत सिद्ध झाला पाहिजे. त्यावांचून शिक्षा करणें हा रानटीपणा होय. अमेरिका तो करणार नाही. म्हणजे पुन्हा डोळ्यांदेखत दौर्बल्य आले. रशियांत हा प्रश्नच नाही. मतस्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य हीं खुळें तेथे नाहीत. न्यायालयांत गुन्हा सिद्ध झाला पाहिजे असा वेडगळ (!) आग्रहहि तेथे नाही. संशय आला की पुरे. मनुष्य यमसदनास धाडून देण्यास तेथे कसलाच प्रत्यवाय नाही. म्हणजे भेद होण्याचा तेथे संभवच नाही. म्हणजे दौर्बल्य नाही. सामर्थ्य अभंग आहे. हें कशामुळे तर रानटी मूल्यें स्वीकारल्यामुळे ! कम्युनिस्टच लढाईला विरोध करतात असे नाही. शांततावादी, अगदी प्रामाणिक शांततावादी लोकहि युद्धविरोधी असतात. त्यांचा विवेक त्यांना स्वस्थ बसू देत नाही. पहिल्या महायुद्धाच्या वेळीं ब्रिटनमध्ये अशा युद्धविरोधी सभा भरत, भाषणें होत, आणि विवेकस्वातंत्र्य हें उच्च मूल्य ब्रिटनने स्वीकारले असल्यामुळे अशा सभांना तेथे पूर्ण मुभा असे. रशिया, चीन, पूर्वजर्मनी येथे अशा सभा होणें शक्य नाही, म्हणजे भेदसंभव नाही.
 व्यक्तिस्वातंत्र्य, मुद्रणस्वातंत्र्य, याप्रमाणेच संघस्वातंत्र्य हेहि लोकशाहीचें एक मूलतत्त्व आहे; त्यामुळे लोकायत्त देशांत वाटेल तितके पक्ष स्थापतां येतात, कामगारांना संघटना करतां येतात, आणि वाटेल त्या वेळी संपहि करता येतो. ऐन युद्धकाळांत कामगारांचा संप लोकायत देशांत पूर्ण शक्य आहे. गिरण्या, कारखाने, रेल्वे, येथील कामगारांनी युद्धकाळी संप केला तर दुसऱ्याच दिवशी युद्ध बंद पडेल आणि राष्ट्राचा पराभव होईल. १९१७ साली रशियांत क्रांति झाली. त्या वेळी अनेक भांडवली लोकायत्त राष्ट्रांनी रशियावर आक्रमण केलें. तें अयशस्वी होण्याचें एक कारण असें