पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



प्रकरण : २

अमेरिकन लोकसत्ता आणि दण्डसत्तेचें आव्हान



 युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या लोकायत्त राष्ट्राने, या लोकसत्तेने सोव्हिएट रशिया व नवचीन या दण्डसत्तांचे आव्हान कसें स्वीकारलें तें आता पाहावयाचें आहे. या बाबतींतली मुख्य समस्या कोणती तें मागे सांगितलेच आहे. व्यक्तिस्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिष्ठा, मानवता, न्याय, सत्य, विश्वशांति, या श्रेष्ठ तत्त्वांची उपासना हा लोकायत्त समाजाचा आत्मा होय. या उदात्त मूल्यांचे रक्षण करून, त्यांना किंचितहि मुरड न घालतां दण्डसत्तांच्या बरोबरीने जड, पाशवी, लष्करी सामर्थ्याची जोपासना कशी करावयाची, अशी ही समस्या आहे. असा पेच नसता तर या दण्डसत्तांचें आव्हान स्वीकारणे हा अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला पोरखेळ वाटला असता. त्याची औद्योगिक प्रगति, शास्त्रज्ञान, शस्त्रास्त्रनिर्मिति हे इतकें अपरिमित आहे की, आज जगांतल्या इतर सर्व सत्ता एकवटल्या तरी त्याची बरोबरी करणें त्यांना शक्य नाही. मग अमेरिकेवर मात करणें दूरच राहो; पण उच्च मूल्यांचें संरक्षण करून, तें ब्रीद संभाळून युद्धसामर्थ्याची जोपासना करता येईल की नाही, असा प्रश्न असल्यामुळे जरा गंभीर विचार करणें हे लोकसत्तांना अवश्य झालें आहे.
 असे का व्हावे याचा आधी थोडा विचार करूं आणि मग अमेरिकेने या दृष्टीने काय योजना केली आहे तें पाहूं.
 उच्च मूल्ये, उदात्त कल्पना, थोर सात्त्विक विचार, विशाल ध्येयवाद यांचा समाजाने स्वीकार केला की, बारा वाटांनी दौर्बल्य त्याच्या अंतरांत शिरतें. त्याचें लढाऊ सामर्थ्य, जीवनकलहांत टिकून राहण्याचे सामर्थ्य