पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण पहिलें : २५

युद्धकल्पनेवर जगत आहेत, आणि त्यासाठी त्यांना माणूसबळ पाहिजे आहे. माओ एकदा म्हणाला की, फक्त चीनलाच युद्धांत यश मिळणे शक्य आहे, कारण ६५ कोटींपैकी ३५ कोटि लोक मेले तरी आपल्याजवळ तीस कोटि शिल्लक राहतीलच !
 मानवी जीवनाकडे पाहण्याची कम्युनिस्ट दण्डसत्तांची ही दृष्टि आहे. विपुल लोकसंख्या हे युद्धाचेंच एक साधन आहे. तोफा, बंदुका, बंदुकीच्या गोळया, तशींच माणसें ! युद्धसाहित्याचा तो एक भाग आहे. रशियांतील मजुरांच्या कोंडवाड्यांत माणसांचे इतके हाल करतात की, तेथे पांच सहा वर्षांवर माणूस जगतच नाही. पण त्यांत कांही बिघडलें असें सत्ताधीशांना वाटत नाही. पांचसहा वर्षे अठरा अठरा तास, शून्याखालच्या थंडीत काम करून, उत्पादन वाढवून माणूस मरून गेला तर त्यांत कांहीच वाईट नाही. वीज, कोळसा खपून जातो तसा माणूसहि खपून गेला तर त्यांत तोटा नाही. आपल्याजवळ अफाट लोकसंख्या आहे. कमी झाली तर आणखी निर्माण होत आहे. औद्योगिक धन, लष्करी साहित्य निर्माण करण्यासाठी तेल, वीज, कोळसा जसा वापरावयाचा तशीच माणसांची श्रमशक्ति वापरावयाची ! रशियाला, चीनला माणसांची श्रमशक्ति हवी आहे, माणूस नको आहे. आता ही श्रमशक्ति कोणत्या माणसांची ? याचें उत्तर अगदी उघड आहे. सत्ता, विद्या, धन, यांमुळे कमालीची विषमता या दोन्ही देशांत आहे. या धनांनी संपन्न असा जो वर्ग त्याची ही श्रमशक्ति नव्हे. तर राहिलेल्या शेकडा ७०-८० लोकांची ही श्रमशक्ति आहे. तेल, कोळसा यांच्याप्रमाणेच या शक्तीचा वापर हा सत्ताधारी वर्ग आपल्या सुखासाठी करीत असतो आणि म्हणून कोळसा, तेल यांचें उत्पादन, जितकें वाढेल तितकें, जसें त्याला हवें असतें, त्याचप्रमाणे मानवाची श्रमशक्ति म्हणजेच लोकसंख्या जेवढी वाढेल तितकी त्याला हवी असते. लोकसंख्येच्या वाढीची चिंता कोणाला ? ज्यांना मानवी मूल्यांचा मान राखावयाचा आहे त्यांना. प्रत्येकाला अन्न, वस्त्र, घर, शिक्षण हें हक्काने मिळाले पाहिजे, प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचा मान राखला राहिजे, त्याचा विकास झाला पाहिजे, हें मूलतत्त्व ज्यांना मान्य आहे त्यांना ! मानवत्व हे अंतिम मूल्य आहे हें ज्यांना मान्य आहे त्यांना लोकसंख्यावाढीचें भय. पण लोकसंख्या हा एक