पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२४ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

प्रकृतिच होती. सोव्हिएट सत्ताधाऱ्यांच्या हिंस्र अत्याचारांचे वर्णन करण्याचें हें स्थळ नव्हे. युरोपीय लेखकांनी ग्रंथच्या ग्रंथ भरून त्यांची वर्णने केली आहेत. त्यांच्या रानटीपणाची कल्पना यावी म्हणून एक दोन प्रकार सांगितले, इतकेंच. आजच्या रशियांतहि या दृष्टीने फारसा फरक झालेला नाही.

लोकसंख्या
 सोव्हिएट रशिया व नवचीन या सत्ता मानवी मूल्यांची कदर करीत नाहीत हे आणखी एका गोष्टीवरून दिसून येतें. ती गोष्ट म्हणजे त्यांचे लोकसंख्येविषयीचें धोरण. आज सोव्हिएट रशियाची लोकसंख्या २० कोटि आहे, आणि चीनची ६५ कोटि आहे. एवढचा अफाट संख्येला जगण्यापुरतें अन्नवस्त्र देण्यास या दोन्ही सत्ता असमर्थ आहेत. सामुदायिक शेतीचे रशियाचे प्रयोग कितपत यशस्वी झाले हैं स्टॅलिननंतर आलेल्या मेलेंकाव्हने जो कबुलीजबाब दिला त्यावरून स्पष्ट होते आणि प्रारंभी सांगितल्याप्रमाणे अन्नवस्त्राच्या उत्पादनावर शक्ति फारशी खर्च नाहीच करावयाची असें रशियाचें धोरण आहे. जी जीवनधने निर्माण होतात ती वरिष्ठवर्ग, सत्ताधारी वर्ग, नवा नोकरशाहीचा वर्ग आणि शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ यांचा वर्ग यांच्यासाठी असतात. रोज बारापंधरा तास कष्ट करणारा जो शेतकरी- कामकरी वर्ग त्याला जेमतेम जगण्यापुरतें अन्नवस्त्र मिळते. पूर्वी तेंहि नव्हतें. असे असूनहि लोकसंख्येचे नियंत्रण करणे दूरच राहो, ती वाढविण्याचेंच या सत्ताधाऱ्यांचे धोरण आहे. हिंदुस्थानांतील लोकसंख्येच्या प्रश्नाचा विचार करणारे लोक सांगतात की, आपण संततिनियमन केले नाही तर आपल्या पंचवार्षिक योजना कितीहि यशस्वी झाल्या तरी कांही उपयोग होणार नाही. कारण अनियंत्रितपणे वाढणाऱ्या लोकसंख्येला पुरेसें अन्नवस्त्र आपण कधीहि निर्माण करू शकणार नाही. म्हणून सध्या आपलें सरकार कुटुंबनियोजनाचा प्रचार करीत आहे. ज्यूलियन हक्सले या विख्यात शास्त्रज्ञाने पुढील पन्नास वर्षांचा विचार करून संततिनियमन केले नाही तर मानवी संस्कृतीची पिछेहाट होऊन आपण पुन्हा जंगली अवस्थेला जाऊं असें निक्षून सांगितले आहे. असे असतांना ६५ कोटि संख्या असलेला चीन नियंत्रणाचा विचारहि करीत नाही, याचा अर्थ काय ? युद्ध, लढाई ! हीं दोन्ही राष्ट्रें