पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण पहिलें : २३

कॉन्सेन्ट्रेशन कँपमध्ये- गुलामांच्या कोंडवाड्यांत- वर्षानुवर्षे पिचत ठेविलें. रानटीपणा म्हणजे याहून निराळें काय असते ? आणि हें सर्व तत्त्वज्ञानपूर्वक केलें जातें. व्यक्तीला व्यक्ति म्हणून महत्त्व असतांच कामा नये, तिला स्वतंत्र अस्तित्व नाहीच, ती समाजासाठी आहे, तिने आपल्या स्वार्थाचा त्याग तर समाजासाठी केलाच पाहिजे पण याहिपेक्षा भयंकर म्हणजे आपल्या मतांचा, विचारांचा, तत्त्वांचाहि त्याग केला पाहिजे, त्यांची निंदा निर्भर्त्सनाहि केली पाहिजे व समाजाविरुद्ध म्हणजेच सत्ताधाऱ्यांविरुद्ध मत दिल्याबद्दल सर्व स्वाभिमान गिळून माफी मागितली पाहिजे, शरणागति पत्करली पाहिजे, असें सोव्हिएट रशियाचें मार्क्सवादी तत्वज्ञान आहे. तेथला समाजवाद तो हाच. एखाद्या प्रचंड यंत्रांत स्क्रू किंवा खिळा असतो तसा समाजांत मानव आहे. तो वस्तु आहे, व्यक्ति नाही. मानव हे अंतिम मूल्य नाही, तें एक साधनभूत व म्हणूनच गौण, क्षुद्र मूल्य आहे; समाज हे अंतिम मूल्य होय असा सोव्हिएट रशियाचा सिद्धान्त आहे. व्यक्तित्ववादी पाश्चात्त्य तत्त्ववेत्ते याच समाजवादी सिद्धान्ताला 'रानटी' असें म्हणतात.
 हा सिद्धान्त म्हणजे केवळ तात्त्विक मतभेद नाही. त्याचा आधार घेऊन नीतीच्या शाश्वत तत्त्वांची सोव्हिएट रशियांत नित्य होळी केली जाते. घरांतला कर्ता पुरुष रशियाबाहेर पळून गेला तर त्याच्या कुटुंबीयांचा त्यांत कसलाहि अपराध नसला तरी त्यांचा अनन्वित छळ केला जातो. त्यांतून ते केव्हा मुक्त होतील ? तर पुत्राने वा कन्येने पित्याची जाहीर निंदा केली, त्याचा निषेध केला तर! पत्नीने पतीची जाहीर मानखंडना केली तर ! अशी निंदा रशियांत सक्तीने करावयाला लावतात. कुटुंबापेक्षा समाज श्रेष्ठ असल्यामुळे असें करणें तेथे युक्तच आहे. स्टॅलिन मृत्यु पावला त्या वेळी १४ डॉक्टरांच्यावर खटले भरले होते, त्यांनी पाश्चात्य साम्राज्यशाहीला वश होऊन अनेक सोव्हिएट अधिकाऱ्यांना विषाचीं इंजेक्शनें दिली व आणखी असेच अनेक घातपात केले असे त्यांच्यावर आरोप होते. त्यांनी तसे कबुलीजबाबहि लिहून दिले होते; पण त्यांच्या नशिबाने स्टॅलिन तेवढ्यांत मृत्यु पावला, आणि मागून आलेल्या सत्ताधान्याने ते सर्व खटले काढून घेऊन त्यांना निर्दोषी ठरविलें. त्यांचे कबुलीजबाब कसे असतील याची यावरून सहज कल्पना येईल. न्यायाची, सत्याची ही पराकाष्ठेची विटंबना होय. पण स्टॅलिनच्या राजवटीचें हें नित्याचेच लक्षण होतें. ती