पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२२ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

कम्युनिस्ट दण्डसत्ता या उत्कर्षपथावर आहेत एवढ्यासाठीच पाश्चात्त्य सत्तांनी त्यांच्याशी दावा धरला आहे असें नाही. हा संग्राम वस्तुतः दोन राष्ट्रांमधला नसून समाजरचनेच्या दोन मूल तत्त्वांमधला आहे, आणि दण्डसत्तांनी जीं तत्त्वें स्वीकारली आहेत ती अत्यंत निंद्य व अधोगामी असल्यामुळे पाश्चात्य लोकसत्ता त्यांना रानटी, हिंस्र, सैतानी म्हणतात. हा रानटीपणा नेमका कशांत आहे तें आता आपणांस पाहावयाचे आहे. वरील विवेचन करतांना मधून मधून त्याची कांहीशी चिकित्सा केलेलीच आहे. पण कांहीशा विस्ताराने त्याचें वर्णन केलें म्हणजे एकमेकीला आव्हान देऊन रणांगणांत उतरूं इच्छिणाऱ्या या दोन शक्तींचे स्वरूप आपणांस यथार्थपणे आकळतां येईल.

रानटीपणा
 औद्योगीकरण, शास्त्रज्ञान, यंत्रज्ञान, यांची अहोरात्र उपासना करणाऱ्या देशाला, आपल्या देशांतील प्रत्येक नागरिकास साक्षर करण्याची प्रतिज्ञा करून ती अल्पावधीत पार पाडणाऱ्या नेत्यांना, ज्ञानाच्या क्षेत्रांत अवघ्या चाळीस वर्षात पाश्चात्त्य राष्ट्रांवर मात करणाऱ्या सोव्हिएट रशियासारख्या राष्ट्राला 'रानटी' ही पदवी कां दिली जाते, तिचा अर्थ काय, ती कितपत सयुक्तिक आहे याचा विचार आपण करीत आहों. या रानटीपणाचें मुख्य लक्षण म्हणजे मानवतेचा, मानवी मूल्यांचा संपूर्ण अभाव हें होय. मानवी मूल्यांचा सोव्हिएट रशियांत पूर्ण लोप झाला आहे हें स्टॅलिनच्या मरणानंतर क्रुश्चेव्हने त्याच्या पापांचा व आसुरी, रानटी कृत्यांचा जो पाढा वाचला त्यावरून स्पष्ट होईल. त्या पुराव्याची गरज होती असें नाही. सर्व जगाला स्टॅलिनच्या त्या हिंस्र कृत्यांची माहिती झालेलीच होती; पण आता ती अगदी अधिकृत रीतीने मिळाली म्हणून तिचें महत्त्व रशिया म्हणजे त्या वेळी रौरव नरक होता, यमपुरीसहि बरी म्हणवीत होता, असें क्रुश्चेव्हच्या भाषणावरून दिसतें. मानवी जीवन म्हणजे सोव्हिएट सत्ताधाऱ्यांना कःपदार्थ वाटतें, किडामुंगीपेक्षा त्याला त्यांच्या लेखीं जास्त महत्त्व नाही; म्हणूनच आपल्या मताला किंवा ठरविलेल्या कार्यक्रमाला विरोध करणाऱ्या लक्षावधि लोकांना त्यांनी कंठस्नान घातले आणि ज्यांना असा मृत्युदण्ड दिला नाही त्यांना रौरव नरकापेक्षाहि भयानक अशा