पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण पहिले : २१

नेत्यांनी जनतेंत कोणत्याहि उपायाने का होईना आपल्या मातृभूमीविषयी पराकाष्ठेची भक्ति, स्वदेशाचा प्रबल अभिमान निश्चित निर्माण केला आहे. तेथे प्रारंभी भयंकर कत्तली झाल्या, अजूनहि क्वचित् होतात. तिथे कसलेंहि व्यक्तिस्वातंत्र्य नाही आणि सर्वांत मोठी व्यथा म्हणजे अन्नवस्त्राची तेथे फार मोठी वाण आहे. असे असूनहि रशिया किंवा चीन येथील जनता स्वदेशाच्या अभिमानाने प्रेरित होऊन आपल्या नेत्यांच्या मागोमाग जाण्यास सिद्ध झाली आहे. यांत सक्तीचा, जुलमाचा, दण्डसत्तेचा भाग फार मोठा असला तरी खऱ्या निष्ठेचा, जिवंत भक्तीचाहि भाग अगदी उपेक्षणीय आहे असे म्हणता येणार नाही. त्या देशांत जाऊन आलेले शत्रुपक्षीय लोकहि तेथील जनता कांही विलक्षण उत्साहाने, चैतन्याने कांही नव्या ध्येयवादाने प्रेरित झालेली आहे असा निर्वाळा देतात. यांत एकशतांश जरी सत्य असले तरी त्याला फार मोठा अर्थ आहे; आणि यांतच त्या दण्डासत्तांचें सामर्थ्य आहे.
 रशिया, चीन या दण्डसत्तांनी षडंग बल कसें प्राप्त करून घेतले आहे याचा येथवर विचार केला. त्यावरून या दण्डसत्तांनी लोकसत्तांना आव्हान दिलें आहे असें कां म्हणतात आणि त्या आव्हानांत कितपत अर्थ आहे हें ध्यानी येईल. पण या आव्हानाची चिकित्सा करीत असतांना औद्योगीकरण, शास्त्रज्ञान, राष्ट्रभक्ति यांचें जें वर्णन केलें त्यावरून या षडंग बलांत आक्षेपार्ह असें काय आहे असा एक प्रश्न निर्माण होतो. आरंभी सांगितले आहे की, पाश्चात्त्य लोकसत्ता या दण्डसत्तांना आसुरी, रानटी, हिंस्र असें म्हणतात. त्यांनी केलेली प्रगति मान्य करूनहि ती नैतिक दृष्ट्या अत्यंत हिडीस आहे, जगाला मानवतेला ते लांछन आहे, काळिमा आहे असें म्हणतात. या टीकेचा अर्थ समजावून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आज अमेरिका जपान, जर्मनी या युद्धकाळांतल्या शत्रुराष्ट्रांना त्यांच्या उत्कर्षासाठी वाटेल तें साह्य करण्यास सिद्ध आहे. जर्मनीला युद्ध समाप्ती- नंतरच्या ७-८ वर्षांच्या काळांत अमेरिकेने १८०० कोट रुपयांचे साह्य केले आहे. हिंदुस्थान हें विस्ताराने व लोकसंख्येने फार मोठें व उदयोन्मुख असे राष्ट्र आहे. पण त्याची उदयोन्मुख सत्ता हें आपल्याला एक आव्हान आहे असे तर अमेरिका मानीत नाहीच; उलट त्याच्या उत्कर्षासाठी हरप्रकारें साह्य करावे अशीच तिची भूमिका आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की,