पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२० : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान


विभूतिपूजा
 केवळ दण्डसत्तेने जिवंत राष्ट्रनिष्ठा निर्माण करतां येईल काय अशी शंका या ठिकाणी आपल्याला येईल, आणि तशी येणें अगदी साहजिक आहे; पण केवळ दण्डसत्तेने हे कार्य साधलेले नाही. तिच्या जोडीला विभूतिपूजा व अंधश्रद्धा या वृत्तींचाहि दण्डायत्त देशांचे नेते उपयोग करीत असतात. स्टॅलिनविषयी सोव्हिएट जनतेच्या मनांत कोणत्या श्रद्धा रशियन प्रचारकांनी रुजविल्या होत्या हे आपण पाहिले तर वरील कोडें आपल्याला सहज उलगडेल. रशियांत प्रत्येक समारंभाच्या आदि-अंती स्टॅलिनला नमन केलें जाई. स्टॅलिन म्हणजे मानवजातीच्या आशेची ज्योत, मानवाच्या सुखाचा विधाता, पृथ्वीचे चिरतारुण्य, सूर्याची प्रतिभा अशी त्याची नित्य स्तुति केली जाई. स्टलिन हा सूर्यचंद्रांचा शास्ता, अनंताची मूर्ति असे त्याचे नित्य स्तोत्र गाइलें जाई. रोगी त्याच्या कृपेनेच बरे होतात, युद्धांत विजय त्याच्यामुळेच मिळतो, जगांतल्या सर्व भावी पिढ्यांचा तो गुरु आहे अशी श्रद्धा रशियन जनतेत नित्य जोपासली जाई; आणि या स्तवनांत शास्त्रज्ञ, तत्त्वदेत्ते, इतिहासकार, राजकारणी, मुत्सद्दी, कवि व सेनापति सर्वं सूर धरीत. चीनमध्ये माओविषयी असाच प्रचार चालतो. जर्मनीसारख्या ज्ञानविज्ञानांत प्रगतीच्या अग्रभागी असलेल्या देशांत हिटलरला अंधविभूतिपूजेची वृत्ति जोपासतां आली. मग रशिया, चीन यांसारख्या देशांतील अंधजनतेत तें दसपटीने जास्त शक्य झाले असल्यास नवल काय ? मागल्या काळांत लोकांच्या अंधश्रद्धेमुळे पोपच्या पीठाला जें सामर्थ्य प्राप्त झालें होतें तेच अर्वाचीन काळांत स्टलिनच्या व माओच्या पीठाने प्राप्त करून घेतले आहे. नेत्यांवरील या अंधश्रद्धेमुळेच त्यांनी जरी घोर अत्याचार केले तरी जनतेच्या मनांत विद्रोही वृत्ति निर्माण होत नाहीत व समाजसंघटना भंगत नाही. १९३३ च्या जूनमध्ये जर्मनीत हिटलरने एका रात्री शेकडो, हजारो लोकांची हत्या केली; पण जर्मन जनतेची त्याच्यावरची व जर्मन राष्ट्रावरची निष्ठा चळली नाही. 'फ्यूहररनी केलें तें न्याय्यच असले पाहिजे' असेच ती म्हणाली. दण्डायत्त देशांत राष्ट्रनिष्ठा अशी व्यक्तिनिष्ठ, विभूति- निष्ठ असते, पण म्हणूनच ती जास्त अंध व जास्त समर्थ होते.
 वरील वर्णनावरून एक गोष्ट स्पष्ट होईल की, दण्डायत्त देशांतील