पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण पहिले : १९

(रीडर्स डायजेस्ट- एप्रिल १९५९). जॉन गुंथूर यांनी रशिया याच अमेरिका द्वेषावर पोसला जात आहे हें आपल्या ग्रंथांत दाखविलें आहे.
 परक्यांचा द्वेष ही एक बाजू झाली. तिच्याहून शतपटीने जास्त महत्त्व पूर्वपरंपरेचा अभिमान हा जो राष्ट्रनिष्ठेचा आत्मा, त्याला आहे. मार्क्स- मताने हा अभिमान प्रतिक्रिप्रात्मक, पराभूतवृत्तीचा द्योतक व सर्वथा त्याज्य होय. सोव्हिएट नेत्यांना आरंभी याच भ्रांतीने पछाडलें होतें. पण सामर्थ्य वाढविण्याचे धोरण ठरतांच त्यांनी मार्क्सवाद उधळून दिला; आणि परंपरेची पूजा अत्यंत भक्तीने सुरू केली. अलेक्झँडर नेव्हस्की, पीटर दी ग्रेट, कुटुसाफ, टॉलस्टॉय यांची प्रारंभी हेटाळणी होत असे. आता हे सर्व पुण्यश्लोक आहेत. रशियाला १९१७ च्या आधी इतिहासच नाही असें प्रारंभी शिकविलें जाई. आता तो इतिहास, झारशाहीने सैबेरियांत जीं आक्रमणें केलीं त्यांच्या वृत्तान्तासकट अत्यंत उज्ज्वल म्हणून गौरविला जातो, शिकविला जातो, पढविला जातो.
 असा मातृभूमीच्या गौरवाचा व परकीयांच्या द्वेषाचा प्रचार अहोरात्र चालू असल्यामुळे वीस कोट रशियन जनता व पासष्ट कोट चिनो जनता आज राजकीय दृष्ट्या प्रबुद्ध झाली आहे आणि कम्युनिस्ट दण्डसत्तांचें हें फार मोठें बळ आहे. मागल्या काळीं या अफाट देशांत ही जनता अंधारयुगांत, अज्ञानांत हताश होऊन, दैववादी बनून राजकारणाविषयी, देशाच्या भवि तव्याविषयी पूर्ण उदासीन होऊन, अर्धनिद्रेत घोरत पडलेली असे. सतराव्या अठराव्या शतकांत पश्चिम युरोपांत राष्ट्रनिष्ठा निर्माण होऊन तेथली सर्व जनता प्रबुद्ध झाली. देशाच्या भवितव्यांची जबाबदारी स्वतःच्या शिरावर आहे, असें मानूं लागली, म्हणून तीं राष्ट्र समर्थ झाली. (हिंदुस्थानांतील जनता अशीच अप्रबुद्ध व उदासीन होती. पण त्यासाठीच तिचा गौरव करण्याची सध्या चाल आहे ! या देशांत वेडेपणा किती पिकावा याला कांही मर्यादाच नाही का ?) तीच राजकीय प्रबुद्धता दण्डसत्तांकित देशांतं आता निर्माण झाली आहे आणि अशा या प्रबुद्ध जनतेची संख्या पाश्चात्य लोकसत्तांच्या तुलनेने पाहतां अमर्याद आहे, अपर्याप्त आहे. एवढी जनता पिसाळून उठली तर काय होईल या विचाराने लोकायत्त देशांतील नागरिक अहोरात्र चिताग्रस्त झाले तर त्यांत नवल नाही.