पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१८ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

चतुर व्यवहारनिपुण नेते देशाच्या उत्कर्षासाठी परक्याच्या द्वेषावर ही भावना उभारून तिचा कुशलतेने उपयोग करून घेतात. स्वतःच्या राष्ट्राविषयीची भक्ति व शत्रुराष्ट्राचा द्वेष या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असें म्हटलें तरी चालेल.
 इतिहासाने तर याहिपुढे जाऊन एक सिद्धान्त सांगितला आहे. दीर्घकालीन युद्धांतून, म्हणजे सर्वांना समान असलेल्या शत्रूच्या द्वेषांतूनच पुष्कळ वेळा राष्ट्रनिष्ठा निर्माण झाली आहे. इंग्लंड आणि फ्रान्स या दोन देशांत चौदाव्या शतकांत शतवार्षिक युद्ध चालू होतें. त्यांतूनच या देशांत राष्ट्रभावना निर्माण झाली. १८७० साली तर बिस्मार्कने फ्रान्सशी मुद्दाम युद्ध घडवून आणून स्वतःच्या राष्ट्राची संघटना केली. तुर्की जनतेंत इंग्रजांविषयी जो द्वेष भडकला होता त्याच्याच साह्याने केमालपाशाने तुर्कराष्ट्राची संघटना केली. भारतीय राष्ट्राच्या ऐक्याची जोपासना इंग्रजांशीं आपण जो लढा दिला, जुलमी राज्यकर्त्यांविषयी जो जळजळीत द्वेष चित्तांत बाळगला त्यावर झाली आहे. हिटलरने पहिल्या महायुद्धांत जर्मनीला पराभूत करणाऱ्या राष्ट्रांविषयी जर्मन जनतेंत पराकाष्ठेचा संताप व द्वेष प्रसृत करूनच तिची संघटना केली व तिच्या ठायीं अपार, अपार सामर्थ्य निर्माण केलें. रशिया व चीन यांनी आज त्याच मार्गाने सामर्थ्याची उपासना चालविली आहे. जॉन स्ट्रॉम हे एक अमेरिकन वृत्तपत्रकार आहेत. नुकताच चीनमध्ये साडेसात हजार मैलांचा प्रवास करून ते आले. ते म्हणतात की, आज चिनी मनाचें पोषण अमेरिका द्वेषावर होत आहे. तेथील अर्धपोटी, अर्धनग्न जनता आज अपार कष्ट करीत आहे, औद्योगीकरण करण्यासाठी, उत्पादन वाढविण्यासाठी हाडें पिचून टाकणारे कष्ट करीत आहे. तिच्यामागे प्रेरणा कोणती आहे ? अमेरिकाद्वेष ! "एक शेर गहू अधिक पिकविलात तर एक बंदुकीची गोळी जास्त विकत घेतां येईल, आणि आक्रमक साम्राज्यवादी अमेरिकन शिपायाशी तुम्ही मुकाबला करू शकाल. पोलाद जितके जास्त निर्माण कराल तितक्या तोफा जास्त तयार होतील, मग आपल्याला अमेरिकन आक्रमणाला तोंड देतां येईल. हें न केलें तर ! आक्रमण, पारतंत्र्य, गुलामगिरी, सर्वनाश !" असा प्रचार तेथे चालतो; आणि त्याने भारून जाऊन तेथील जनता हिमालय कष्ट उपशीत आहे.