पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण पहिलें : १७

राहणाऱ्या असंख्य जनतेला विश्वशांति, विश्वव्यापक संघटना, अखिल मानव्य या कल्पनांनी कसलीहि प्रेरणा निर्माण होत नाही. रागद्वेषादि भावनामात्र तिच्या चित्तांत प्रबळ असतात, आणि याच रागद्वेषांना जास्त उन्नत रूप देऊन राष्ट्रांतील कर्तबगार, कुशल नेते त्या जनतेच्या ठायीं राष्ट्राच्या शत्रूविषयी द्वेष निर्माण करून त्यांतून मोठी शक्ति निर्माण करतात. विश्वैक्याचा उदात्त विचार करणाऱ्या लोकांना राष्ट्रनिष्ठा आणि त्यांतहि परक्यांचा द्वेष, शत्रूविषयी चीड या भावना संकुचित वाटतात.
 आज अनेक पंडित राष्ट्रनिष्ठेचा जोराने निषेध करतांना दिसतात तें याच कारणासाठी. पण हे सर्व सुखासीन पंडित होत. खेड्यामध्ये आज अज्ञान, दारिद्र्य यांत खितपत पडलेल्या जनतेच्या दृष्टीने राष्ट्रभक्ति हे फार विशाल तत्त्वज्ञान आहे. लहानशा जमिनीच्या तुकड्यावरून, क्षुद्र मानापमानाच्या कल्पनांवरून भडकून जाऊन पिसाट होऊन ते लोक एकमेकांचे खून करण्यास प्रवृत्त होतात. लहानशा ग्रामीण जीवनापलीकडे त्यांची दृष्टि कधीच गेलेली नसते. अखिल समाजाच्या उत्कर्षापकर्षाची जबाबदारी आपल्यावर आहे या विचाराचा स्पर्शहि त्यांना झालेला नसतो. अशा जनतेला राष्ट्रभक्ति शिकविणें म्हणजे तिची मनें संकुचित करणें नसून तिला उदात्त ध्येयवादाची शिकवण देणेंच होय. परक्यांच्या द्वेषावर जरी ही राष्ट्रनिष्ठा उभारली असली तरी क्षुद्र परिसरांतल्या क्षुद्र प्रश्नांची विवंचना करण्यांत ज्यांचा जन्म जावयाचा त्यांना अमेरिकन साम्राज्यशाहीचें आक्रमण, त्यापासून आपल्या मातृभूमीचे, अखिल चिनी राष्ट्राचें रक्षण या विवंचना शिकविणें आणि त्या प्रेरणेने ६५ कोटि लोकांच्या ठायीं अहोरात्र कार्यमग्न होण्यांत भूषण वाटावे अशी वृत्ति निर्माण करणें ही समाजाची निश्चित प्रगति आहे. अज्ञानग्रस्त, दैवहत अशा मनुष्याच्या चित्तांत अखिल राष्ट्राच्या प्रश्नांचा विचार करण्याची प्रवृत्ति निर्माण झाली, समाजाच्या उत्कर्षाची मी चिंता वाहतों हा अहंकार, ही अस्मिता त्याच्या मनांत उद्भवली तर त्याच्या व्यक्तित्वाचा तो निश्चित विकास आहे; आणि सामान्य मानव हा जास्तीकरून भाववश, रागद्वेषवश असल्यामुळे कोठला तरी शत्रु समोर आहे, त्याच्याशी लढा करावयाचा आहे, अशी भावना असल्यावांचून त्याचें रक्त चेतत नाही. तो उद्योगोन्मुख होत नाही. म्हणूनच राष्ट्रांतील
 लो. २